महापालिकेच्या अनेक योजना आणि त्या योजनांवर केलेले खर्च सातत्याने वादग्रस्त ठरत असताना महापालिकेने शहरात तीस ठिकाणी सुरू केलेली ओपन जिम मात्र पुणेकरांच्या कौतुकाला पात्र ठरली आहेत. शहरातील ओपन जीममध्ये आता थंडीमुळे गर्दी वाढत असून महिलांसाठी स्वतंत्र जिम सुरू करण्याचीही मागणी अनेक ठिकाणी नगरसेवकांकडे केली जात आहे.
महापालिकेच्या उद्यानांमध्ये वा सार्वजनिक मोकळ्या जागांमध्ये अंदाजपत्रकातील तरतुदींनुसार ओपन जिम सुरू झाली असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद या संकल्पनेला मिळत आहे. या जिममध्ये व्यायामासाठी जी साधने बसवण्यात आली आहेत ती उत्तम दर्जाची तसेच वैविध्यपूर्ण असल्यामुळे या ठिकाणी व्यायामाला येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ होत असल्याचा अनुभव नगरसेवकांनी सांगितला.
तळजाई येथे स्थानिक नगरसेवक सुभाष जगताप यांनी सर्वप्रथम ओपन जिमचा प्रारंभ केला. तेव्हा ही संकल्पना पुण्यात पूर्णत: नवीन होती. महापालिकेने केलेला हा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आणि जगताप यांनी पाठोपाठ सहकारनगरमध्येही ओपन जिमचा प्रारंभ केला. त्यानंतर अनेक नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांमध्ये ओपन जिम सुरू केली. उद्यानांमध्ये सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी जे नागरिक मोठय़ा संख्येने येतात त्यांच्यासाठी ओपन जिम ही पर्वणीच ठरली. त्यामुळे एकेक करत आतापर्यंत शहरात तीस ठिकाणी ओपन जिम सुरू झाली आहेत. ज्यांना व्यायामाची आवड आहे असे नागरिक या जिमचा लाभ घेतातच शिवाय या ओपन जिममध्ये व्यायामासाठी जी साधने बसवण्यात आली आहेत ती अत्याधुनिक असल्यामुळे इतरही अनेक जण ती साधने पाहून आपोआप या जिममध्ये व्यायामासाठी येतात असा अनुभव आहे.

स्वखर्चातूनही ओपन जिम
नागरिकांचा व्यायामाकडे असलेला ओढा लक्षात घेऊन कात्रजला स्थानिक नगरसेवक वसंत मोरे यांनी स्वखर्चातून ओपन जिम सुरू केली आहे. महापालिकेच्या जागेवरील या जिमसाठी बाजूने भिंती बांधून देण्याचा खर्च महापालिकेने केला असून व्यायामाच्या साधनांचा सुमारे पाच लाखांचा खर्च नगरसेवक वसंत मोरे यांनी केला आहे. या जिमला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून महिलांकडून वेगळ्या जिमची मागणी होत असल्याचे मोरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.