राज्यावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन बाष्प येत असल्याने सध्या पूर्वमोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. पुढील चार दिवस सर्वच विभागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला असून, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मराठवाड्यात १९ ते २२ मार्च दरम्यान पाऊस राहणार आहे. विदर्भात गुरुवारी नागपूरमध्ये पावसाची नोंद झाली. या भागांत पुढील दोन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात १९ ते २१ मार्च या कालावधीत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता असून, कोकणात २१ आणि २२ मार्चला काही भागांत पावसाचा अंदाज आहे.

मध्य भारत आणि दक्षिणेतील केरळ, कर्नाटकमध्ये २१ मार्चपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस राहणार आहे. त्यानंतर २२ मार्चपासून उत्तरेकडील राज्यांत पावसाला अनुकूल स्थिती असेल. हिमालयाच्या विभागात जोरदार पावसाचा इशारा आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा वाढला असल्याने उन्हाचे चटके जाणवत असले, तरी पुढील एक-दोन दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. या कालावधीत रात्रीचे किमान तापमान मात्र वाढणार असल्याने रात्रीच्या उकाड्यात वाढ होईल.

हवाभान… सध्या संपूर्ण मध्य भारतावरच कमी दाबाचे पट्टे निर्माण होत आहेत. परिणामी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आदी राज्यांत पावसाला अनुकूल स्थिती आहे. राज्यात सध्या मराठवाडा आणि लगतच्या भागामध्ये हवेची चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पाऊस कुठे? हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार १९ ते २२ मार्च या कालावधीत औरंगाबाद, जालना, परभणी, पुणे, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, बीडर्, हिंगोली, नागपूर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, २१ आणि २२ मार्चला रायगड, रत्नागिरीर्, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आदी जिल्ह््यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.