News Flash

कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

मराठवाडा, विदर्भातही पावसाचा दिलासा

संग्रहित छायाचित्र

दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत सध्या कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यात पावसासाठी पुन्हा अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. १५ ते १७ जुलै या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होणार असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

मराठवाडा आणि विदर्भालाही पुढील चार ते पाच दिवसांत पावसाचा दिलासा मिळणार आहे. सोमवारी (१३ जुलै) मुंबई, रत्नागिरीसह कोकण विभागात अनेक ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

राज्याच्या किनारपट्टीवर असलेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता कमी झाल्याने पावसाचा जोरही कमी झाला होता. कोकणात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत असला, तरी मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाडा, विदर्भातील बहुतांश भागात पावसाने दडी मारली आहे. मात्र, कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता वाढत असल्याने पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून मुंबई परिसरासह कोकण विभागांत काही ठिकाणी पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यातील बहुतांश भागांत पाऊस हजेरी लावणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार १४ जुलैला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात या दिवशी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे.

१५ जुलैला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. १६ आणि १७ जुलैला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी असेल. या कालावधीत मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस होणार आहे.

पुणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी इशारा

अनुकूल वातावरणामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असतानाच १५ जुलैला पुणे जिल्ह्यासह रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे जिल्ह्यंतील प्रामुख्याने घाटक्षेत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.  याशिवाय तीन ते चार दिवसांच्या कालावधीत मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 12:14 am

Web Title: warning of heavy rains in konkan central maharashtra abn 97
Next Stories
1 ‘सहज बोलता बोलता’मध्ये शुक्रवारी राहुल देशपांडे यांच्याशी संवाद
2 सीबीएसई बारावीच्या निकालात ५.३८ टक्क्यांनी वाढ
3 पुण्यात सोन्याचा ‘नेकलेस कम मास्क’ बाजारात; साडेसहा लाखांच्या महागड्या मास्कची चर्चा
Just Now!
X