News Flash

राज्यात काही ठिकाणी  वादळी पावसाचा इशारा

पाच दिवस पावसाळी स्थिती, तापमानवाढही कायम पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांत तुरळक ठिकाणी रविवारपासून पुढील पाच दिवस पावसाळी स्थिती

पाच दिवस पावसाळी स्थिती, तापमानवाढही कायम

पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांत तुरळक ठिकाणी रविवारपासून पुढील पाच दिवस पावसाळी स्थिती निर्माण होणार आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा उत्तर अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीमा या मार्गाने गेला आहे. परिणामी सध्या तेलंगणासह दक्षिणेकडील आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आदी राज्यांत पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातही रविवारपासून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानाची स्थिती आहे. मात्र, काही भागांत संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ होत आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २५ एप्रिलपासून पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या दोन्ही विभागात २७ एप्रिलनंतर सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात २६ एप्रिलनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांच्या तुलनेत शनिवारी सर्वच भागातील क माल तापमानात वाढ झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३८ ते ४० अंशांदरम्यान पोहोचला. विदर्भात सर्वच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांपुढे होता. शनिवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यांत?

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाची शक्यता असली, तरी पावसाच्या प्रमाणापेक्षा सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट अधिक राहणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत प्रामुख्याने पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 12:16 am

Web Title: warning of torrential rains in some places in the state akp 94
Next Stories
1 राज्यातील कृषी पदव्यांना ‘बीएस्सी अ‍ॅग्रि’ समकक्षतेचा दर्जा
2 पिंपरी : करोनाबाधितास रुग्णालयात दाखल करण्यासाठी आरोग्यमंत्री टोपेंचा डॉक्टरांना फोन!
3 “कुणीतरी काहीतरी सांगावं आणि मी…”, चंद्रकांत पाटलांच्या सल्ल्यावर अजित पवारांची कोपरखळी!
Just Now!
X