परतीच्या पावसाने विविध भागांना फटका दिला असतानाच पुन्हा एकदा राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेशकडून येणाऱ्या कमी दाबाच्या तीव्र पट्टय़ामुळे पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडय़ासह विदर्भात काही ठिकाणी धुवाधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

सध्या मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू आहे. राज्याच्या विविध भागाला या महिन्यात पावसाने फटका दिला. अनेक ठिकाणी शेतीमालाचेही नुकसान झाले. त्यातच आता उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील अतितीव्र कमी दाबाचा पट्टा तेलंगणकडे सरकून त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्टय़ात होणार आहे. या पट्टय़ाचा ताशी वेग ५५ ते ७५ किलोमीटर राहणार आहे.

तेलंगणकडून हा तीव्र कमी दाबाचा पट्टा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र पार करून पुढे उत्तर कोकण त्यानंतर दक्षिण गुजरातकडे सरकणार आहे. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. १७  ऑक्टोबपर्यंत या भागांत विजांचा कडकडाट होऊन वारा वाहण्याची शक्यता आहे.

कारण काय?

कमी दाबाचे तीव्र वादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले. त्याचे कमी दाबाच्या तीव्र पट्टय़ात रूपांतर होत असून, हा पट्टा महाराष्ट्राच्या दिशेने सरकतो आहे. परिणामी राज्यावर वादळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे.

पर्जन्यभान..

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार १४ ऑक्टोबरला कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, बीड, परभणी या जिल्ह्य़ांत अतिवृष्टीची शक्यता आहे. रायगड, धुळे या जिल्ह्य़ांत १५ ऑक्टोबरला अतिवृष्टीचा इशारा आहे. मुंबई, ठाणे, पुणे या भागातही पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक, नंदुरबार आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.