पुणे शहरातील कचरा प्रश्नी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पालकमंत्री आणि महापौर पुणेकरांना कचरा कोंडीमध्ये सोडून गेल्याचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या कार्यालयाबाहेर भजन म्हणत ठिय्या आंदोलन केले.

उरूळी देवाची आणि फुरुसुंगी ग्रामस्थ मागील १९ दिवसांपासून शहरातील कचरा तेथील कचरा डेपोमध्ये टाकून देण्यास विरोध करत आहेत तेथील ग्रामस्थांनी भजन कीर्तन, जागरण गोंधळ, घंटानाद आणि अर्ध नग्न होत आंदोलन करुन पुणे शहरातील कचरा टाकण्यास विरोध दर्शविला आहे. महापौर मुक्ता टिळक आणि प्रशासनाने अनेकदा त्यांच्याशी चर्चा करुन हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर अद्याप ठाम आहेत. आतापर्यंत कचराप्रश्नी झालेल्या बैठकी निष्फळ ठरल्यामुळे शहरातील कचरा पेटया वाहताना दिसत आहेत. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात मुक्ता टिळक आणि शहराचे पालकमंत्री गिरीश बापट या परदेशी दौऱ्यावर गेल्यामुळे विरोधकांचा जोर आणखी वाढला आहे. पुणेकरांना कचऱ्यामध्ये सोडून महापौर परदेशी कशा जाऊ शकतात असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी निषेध नोंदविला. यावेळी महापालिकेत विरोधकांनी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी विरोधी पक्ष नेते चेतन तुपे म्हणाले की, पुणे शहरातील भाजप कचरा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरली आहे. पालिका ते संसदेपर्यंत भाजपची सत्ता आहे. तरी देखील उरुळी देवाची आणि फुरुसुंगी येथील डेपोचा प्रश्न त्यांना मार्गी लावता येत नाही. पुणेकर कचरा कोडींत सोडून महापौर परदेशी दौऱ्यावर कशा जाऊ शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. येत्या काळात प्रश्न न सुटल्यास तीव्र लढा उभारणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.