समाज माध्यमावरील (युट्यूब) चित्रफीत पाहून बनावट नोटा तयार करणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. २०० रुपयांच्या नोटा तयार केल्यानंतर त्या किरकोळ विक्रेत्यांकडे वटविण्याच्या तयारीत असताना तरुण पकडला गेला. त्याच्याकडून २०० रुपयांच्या सात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

सोहेल सलीम शेख (वय २१, रा. गांधीनगर, देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेखने काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर नोटा छापण्याची चित्रफीत पाहिली होती. त्यानंतर त्याने नवीन प्रिंटर विकत घेतला. चित्रफीतीमध्ये दाखविण्यात आल्याप्रमाणे त्याने २०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केली. २०० रुपयांच्या नोटा तयार केल्यानंतर त्या शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडे त्याने वटविण्यास सुरुवात केली. पानपट्टीचालक तसेच किरकोळ विक्रेत्यांना त्याने बनावट नोटा दिल्या आणि त्या बदल्यात बिस्किटे, चॉकलेट, सिगारेट अशा वस्तूंची खरेदी केली. गेल्या १५ दिवसांपासून हा प्रकार सुरू होता.

शेख शहराच्या मध्यभागातील नरपतगिरी चौकात बनावट नोटा वटविण्याच्या तयारीत होता. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस नाईक शंकर संपते यांना एका खबऱ्याने ही माहिती दिली. खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा लावला. बनावट नोटा वटविण्याच्या तयारीत असणाऱ्या शेखला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २०० रुपयांच्या सात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक अश्विनी जगताप, शंकर पाटील, सुनील पवार, शंकर संपते, रमेश चौधर आदींनी ही कारवाई केली.