पुण्यात पाणीकपात सुरू झाली, पोहोण्याचे तलाव आणि मोठय़ा प्रमाणावर पाणी लागणाऱ्या सेवाही बंद झाल्या. मात्र, सर्वाधिक पाणी वापर होत असलेली इमारतींची बांधकामे मात्र अजूनही चालूच आहेत. बहुतेक बांधकामांसाठी सर्रास टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
पुण्यात सोमवारपासून पाणीकपात सुरू झाली आहे. शहरातील अनेक भागांत आता पिण्याच्या पाण्यासाठीही ओरड सुरू झाली आहे. महानगरपालिकेच्या क्रीडा संकुलातील आणि खासगी जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर्स यांना पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही शहरात सुरू असलेल्या अनेक बांधकामांसाठी मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा वापर करण्यात येत आहे. बांधकामासाठी मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा वापर होतो. गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम क्षेत्राला थोडे आशेचे किरण दिसू लागल्यानंतर अनेक नवे प्रकल्पही सुरू झाले आहेत. शहराच्या भोवताली असलेल्या उपनगरांमध्ये बांधकामांचे अनेक जुने आणि नवे प्रकल्प अधिक असले, तरी मध्यवर्ती भागांतही अनेक प्रकल्प अद्याप सुरूच आहेत. अनेक नव्या प्रकल्पांची सुरुवातही करण्यात येत आहे. यातील बहुतेक बांधकामांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहरात पाणी कपात असताना बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्याचवेळी बांधकामासाठी किंवा नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतींसाठी सर्रास बेकादेशीर जलवाहिन्या टाकण्याचेही प्रकार सुरू आहेत.
खासगी कंपन्यांचे प्रकल्प सुरू असताना महानगरपालिकाही मागे राहिलेली नाही. अनेक रस्त्यांवरील चांगले पदपथ उखडून ते नव्याने बांधणे, सायकल ट्रॅक बांधणे यांसाठी पालिकेने आताच मुहूर्त शोधला आहे. सिंहगड रस्त्याला समांतर असणारा डिपी रस्ता, कर्वेनगरमधील भाग येथे पालिकेकडूनच दुरुस्ती आणि बांधकामे चालू आहेत. या ठिकाणी चालणाऱ्या पाण्याच्या वापरावर पालिकेचेच नियंत्रण आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.