महापालिकेकडून पाण्याचा अपव्यय

पाणीबचतीचे महत्त्व सांगून पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड एक वेळ पाणी देण्याची घोषणा महापालिकेने केली. मात्र, ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’..अशी महापालिकेची अवस्था आहे. नागरिकांना पाणीकपातीचे आवाहन करणाऱ्या महापालिकेने स्वत: मात्र मोठय़ा प्रमाणात पाण्याचा अपव्यय चालवला आहे. सुट्टीच्या दिवशी महापालिकेचे चार मजली मुख्यालय पिण्याच्या पाण्याचा वापर करत धुवून स्वच्छ करण्याचे काम अव्याहतपणे सुरू असल्याचे रविवारी दिसून आले.

पिंपरी-चिंचवड शहरात दोन मे पासून दिवसाआड एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत उपलब्ध पाणी जपून वापरण्यासाठी पाणीकपात करण्याचा निर्णय घेतल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. पाऊस लांबल्यास पाणीकपातीमध्ये वाढ करण्याचे सूतोवाचही करण्यात आले आहे. पाणीपुरवठा विभागातील गळतीचा शोध घेण्याचे तसेच बेकायदेशीर नळजोडांवर कारवाई करण्याचे पालिकेने जाहीर केले आहे. एकीकडे, अशी परिस्थिती असताना दुसरीकडे महापालिकेने स्वत: मात्र, पााणीबचतीच्या धोरणाला तिलांजली दिली आहे. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी महापालिकेची चार मजली इमारत धुवून स्वच्छ करण्यात येते. काही वेळा अधिकाऱ्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या मोटारीही धुवून स्वच्छ केल्या जातात. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात पाण्याचा वापर होतो. गेल्या अनेक महिन्यांपासून नित्यक्रमाने हे काम केले जाते. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात पिण्याच्याच पाण्याचा वापर होतो. दोन मे पासून पाणीकपात जाहीर केलेल्या महापालिकेने स्वत: मात्र पाण्याचा अपव्यय चालवला आहे. महापालिकेची चार मजली इमारत, येथील कार्यालये पाण्याने धुवून स्वच्छ करण्याचे काम अजूनही सुरूच आहे. रविवारी दिवसभर खासगी ठेकेदारांचे कर्मचारी हे काम करत होते. या कामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.