पावसाने ओढ दिल्यामुळे पुण्यात उद्यापासून स्विमिंग पूल, वाहनांसाठीचे वॉशिंग सेंटर आणि बांधकामासाठीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय मंगळवारी पुणे महानगरपालिकेतर्फे घेण्यात आला. गेल्या काही दिवसांत पावसाने दडी मारल्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा आटला आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून यापुढे स्विमिंग पूल, वाहनांसाठीचे वॉशिंग सेंटर आणि बांधकामासाठी विहिरी किंवा बोअरवेलचे पाणी वापरावे, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या आदेशानंतरही वरील कारणांसाठी पालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे महानगरपालिकेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.