पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरणावरील दोन पंप पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला कोणतीही कल्पना न देता बंद केले. त्यामुळे पुणेकर नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. पुणे शहराने कमी पाणी घ्यावे असे आदेश जलसंपदा विभागाकडून वारंवार देण्यात आले होते. मात्र महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने जलसंपदा विभागाकडून २ पंपांचा पुरवठा अचानक बंद करण्यात आला. त्यामुळे आता पुणेकरांना कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. अशाप्रकारे अघोषित पाणीकपात केल्याने आता पुणेकरांना कमी पाणी मिळणार आहे.

या दोन पंपांव्दारे होणारा २५० एमएलडी पाणीपुरवठा कमी करण्यात आला असून आता शहराला ११०० एमएलडी पाणीपुरवठा होणार आहे. यापूर्वी देखील दोन वेळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे महापालिकेला कोणतीही कल्पना न देता पाणी तोडले होते. त्या घटनेवरून पुणे महापालिकेच्या सभागृहात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता अचानक पद्धतीने अशाप्रकारे घेण्यात आलेल्या निर्णयाचा परिणाम काय होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. पुणे शहराचियी आजुबाजूला असणाऱ्या धरणांतून शहराला तसेच बाजूच्या गावांनाही शेतीसाठी पाणी पुरवण्यात येते. मात्र मागच्या काही काळापासून पुणे शहराकडून होणारा पाण्याचा वापर वाढल्याने धरणातील साठा घटला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जलसंपदा विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला.