पुण्यात पाणीकपात करण्याच्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयावर सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर ‘असा निर्णय घेतलाच नव्हता,’ असे सांगत अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत पुण्यातील पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय मागे घेतल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.
कालवा समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत पुणे शहराला १५ ऑक्टोबर ते १५ जुलै २०१४ पर्यंत ९.०६ टीएमसी साठा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्यावर्षी याच नऊ महिन्यांसाठी ११.५ टीएमसी पाणीसाठा मंजूर करण्यात आला होता. या पाश्र्वभूमीवर गुरुवारपासून (१७ ऑक्टोबर) संपूर्ण शहराला एक वेळ पाणी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने मंगळवारी घेतला होता. मात्र, सर्व स्तरातून झालेल्या टीकेनंतर पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
याबाबत पवार म्हणाले, ‘‘कालवा समितीच्या बैठकीमध्ये पाणीकपात करण्याबाबत निर्णय झाला नव्हता. आम्ही पुण्याला पाणी द्यायला तयार नाही असे चुकीचे चित्र निर्माण करण्यात आले. मी गेली नऊ वर्षे पुण्याचा पालकमंत्री आहे. पुण्याला पाणी मिळू नये अशी भूमिका कधीच नव्हती. पाण्याच्या मुद्दय़ावर शहर आणि ग्रामीण भागही आक्रमक झाले आहेत. दोन्ही भागांनी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. एकहाती सत्ता नसल्यामुळेही काही निर्णय घेण्यात अडचणी येतात. पाणीवाटपाच्या मुद्दय़ावरून राजकारण करू देणार नाही.’’
पवार यांनी या वेळी मनपाच्या तक्रारींचाही पाढा वाचला. ते म्हणाले, ‘‘शहराने ६.५ टीएमसी सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र, त्याबाबत पालिकेकडून कार्यवाही होत नाही. पाणी गळती रोखण्याबाबतही पालिका कार्यवाही करत नाही. काही कॅनॉल धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत. त्यांची वेळेवर दुरुस्ती होणे गरजेचे आहे. त्याचे काम करायचे झाल्यास एक महिना पाणीपुरवठा खंडित करावा लागेल. त्यासाठी टप्प्याटप्प्याने सात दिवस कॅनॉल बंद ठेवण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे दिला आहे, मात्र पालिका त्याला तयार होत नाही. हे कॅनॉल दुरुस्त करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. वारज्याची जलवाहिनीची दुरुस्ती होणेही आवश्यक आहे. मार्चपर्यंत ते कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.’’
पाणीपुरवठय़ाच्या वेळात बदल नाही
शहराच्या पाणीसाठय़ात कपात करण्याचा सोमवारी घेण्यात आलेला निर्णय रद्द झाल्यामुळे गुरुवार (१७ नोव्हेंबर) पासून शहरात जाहीर करण्यात आलेली पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या ज्या पद्धतीने पाणीपुरवठा सुरू आहे, त्याच वेळांमध्ये व तेवढय़ाच प्रमाणात यापुढेही पाणीपुरवठा सुरू राहील, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. कालवा समितीच्या बैठकीतील निर्णयानंतर थेट पत्रकार परिषदेतूनच पाणीकपात रद्द करण्यात आल्याचे जाहीर झाले आहे. त्यासंबंधीचा कोणताही आदेश तूर्त महापालिकेला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे गुरुवारपासूनच्या नियोजित पाणीकपातीची अंमलबजावणी आता होणार नाही.