पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेसाठीच्या अद्ययावत तपासण्या आता तालुका पातळीवरही होऊ शकणार आहेत. राज्यात तालुका पातळीवर १३० उपविभागीय प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या असून आणखी ८ उपविभागीय प्रयोगशाळा लवकरच कार्यरत होणार आहेत.
राज्याची सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा (एसपीएचएल) पुण्यात आहे. त्याअंतर्गत ३४ जिल्हास्तरीय तपासणी प्रयोगशाळा आहेत. १ मे २०१३ पासून त्यात या नवीन उपविभागीय प्रयोगशाळांची भर पडल्याने तालुका पातळीवरही अधिक अद्ययावत पद्धतींनी पाण्याच्या तपासण्या होऊ शकणार आहेत. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ. आर. एम. शिंदे यांनी ही माहिती दिली.
राज्यात ३५१ लघु प्रयोगशाळा कार्यरत होत्या. यातील काही लघु प्रयोगशाळांचे रुपांतर उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये करण्यात आले आहे. पाण्याच्या अणुजैविक (बॅक्टेरिओलॉजिकल) आणि रासायनिक तपासण्या या प्रयोगशाळांत होणार आहेत. या व्यतिरिक्त विरंजक चूर्णाच्या (ब्लीचिंग पावडर) तपासण्याही येथे होऊ शकणार आहेत. विशेष म्हणजे नंदुरबार, हिंगोली, वाशिम आणि गोंदिया येथेही प्रयोगशाळा स्थापन झाल्या आहेत. या पूर्वी या ठिकाणी तपासण्यांची सोय उपलब्ध नसल्यामुळे तपासण्यांसाठी घेतलेले नमुने अनुक्रमे धुळे, परभणी, अकोला आणि भंडारा येथे पाठवावे लागत.