राज्याच्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाणी पोहोचविण्यासाठी राजस्थानच्या कोटा येथून निघालेली रेल्वेची ‘पाणी एक्सप्रेस’ शनिवारी दुपारी पुण्यात पोहोचली. तेथून ती रात्री उशिरा मिरज येथे पोहोचली. या गाडीला प्रत्येकी ५४ हजार लीटर क्षमतेच्या ४९ वाघिण्या असून, मिरज रेल्वे स्थानकात त्यात पाणी भरून ते लातूरला पोहोचविले जाणार आहे.
लातूर जिल्हय़ामध्ये यंदा दुष्काळाची स्थिती भीषण आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही येथील नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. या भागातील नागरिकांना रेल्वेने पाणी पोहोचविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. याबाबत रेल्वेशी चर्चा करून नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्री राजस्थानमधील कोटा येथून ही पाणी एक्सप्रेस रवाना करण्यात आली होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही गाडी लोणावळा स्थानकात पोहोचली. तत्पूर्वी घाटातील टप्पा पार करण्यासाठी गाडीला जादा इंजिन लावण्यात आले होते. पावणेचारच्या सुमारास पुणे स्थानकावर दाखल झाली. स्थानकावर पाच ते दहा मिनिटे थांबून ही गाडी मिरजकडे पाठविण्यात आली.
रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले, की रेल्वेने केवळ २४ तासांमध्ये पाणी एक्सप्रेस मिरजपर्यंत पोहोचवली आहे. त्यातील वाघिण्यांमध्ये पाणी भरण्याची जबाबदारी आता राज्य शासनाची आहे. रेल्वे केवळ वाहतुकीचे काम करणार आहे. पाणी भरल्यानंतर हव्या त्या वेळेला ही गाडी लातूरकडे रवाना करण्यास रेल्वे तयार आहे. गाडीला वाघिण्यांची संख्या मोठी असल्याने टप्प्याटप्प्याने पाण्याची वाहतूक करावी लागणार आहे.
दरम्यान, लातूरसाठी पाणी एक्सप्रेसच्या वाघिण्यांमध्ये पाणी भरण्यास मिरज रेल्वे फलाटावरच तात्पुरती सुविधा उपलब्ध करून देण्यास रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली असून, यार्डात पाणी भरण्याची सुविधा देण्यासाठी जलवाहिन्यांच्या कामासही सुरुवात करण्यात आली आहे. जलकेंद्रापासून प्रत्यक्ष फलाटावर पाणी आणण्यासाठी अडीच किलोमीटरची वाहिनी टाकण्यात येत आहे.