खडकवासला धरणातून दौंड, इंदापूर व बारामतीसाठी १.०६ टीएमसी (अब्ज घनफूट) पाणी सोडण्याची मागणी होत असताना पाणीसाठय़ाचा विचार करून न्याय्य पद्धतीने पाण्याचे वाटप होईल, असे सांगत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणी सोडण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबत २६ किंवा २७ एप्रिलला निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, साडेसात महिन्यांपासून एकदिवसाआड पाणीकपात करून शहराने वाचविलेले पाणी हातचे जाणार असून, त्यामुळे पुणेकरांसमोर भीषण पाणीसंकट उभे राहण्याची शक्यता आहे. वाचविलेले पाणी पुण्याच्या हक्काचे असून, ते देण्यास आमचा विरोध असल्याची ठाम भूमिका महापौर प्रशांत जगताप यांनी घेतल्याने शहर व जिल्हा पाणीवाद पेटण्याची चिन्हे आहेत.
बापट यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी कालवा समितीची बैठक झाली. त्या वेळी खडकवासला धरणातून पाणी सोडण्याच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. महापौर जगताप, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, आमदार राहुल कुल, दत्तात्रय भरणे, बाबुराव पाचर्णे आदी त्या वेळी उपस्थित होते. दौंड शहर व दौंड, हवेलीतील १७ गावांसाठी ०.५० टीएमसी, इंदापूर शहर व पाच गावांसाठी ०.८० टीएमसी, पुरंदर, दौंड, बारामतीतील १३ गावांसाठी ०.३० टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कुल व भरणे यांनी लावून धरली. शहरातील पाण्याची गरज व स्थिती लक्षात आणून देत महापौर जगपात यांनी त्यास विरोध केला. जिल्हाधिकारी राव यांनी सद्य:स्थिती मांडली. सध्या धरणात ५.६५ टीएमसी पाणी असून, पुण्याची मासिक गरज १.३० टीएमसी आहे. पुढील तीन महिने ३.९० टीएमसी पाणी लागेल. पुण्यात अजून कपात केली तरीही पाणी इंदापूपर्यंत पोहोचू शकणार नाही, असे राव म्हणाले.
बैठकीतील निर्णयाबाबत पत्रकारांशी बोलताना बापट म्हणाले,की पाण्याबाबत अजून मोठी समस्या नाही. पाणीस्थितीबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा करू. कालव्याची दुरुस्ती होणे गरजेचे असून, त्यातून अर्धा टीएमसी पाणी वाढू शकेल. कालव्यातून होणारी पाण्याची गळती, पाण्याचे बाष्पीभवन आदी लक्षात घेऊन पाण्याचा साठा किती राहणार त्यावर पाण्याचे नियोजन करून निर्णय घेतला जाईल. केवळ पिण्यासाठीच पाणी दिले जाणार असून, आता शेतीला पाणी दिले जाणार नाही. सोडलेले पाणी शेतीला वापरले जाणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल.

पुण्याच्या हक्काचे पाणी देणार नाही- महापौर
महापौर प्रशांत जगताप यांनी पाणी सोडण्यास बैठकीत विरोध करीत बैठक पूर्ण न करताच ते पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेऊन बाहेर पडले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की  १.०६ टीएमसी पाण्याची मागणी योग्य नाही. शहराने एकदिवसाआड पाणीकपात करून पाण्याची बचत केली आहे. पावसाचा भरवसा नाही. त्यामुळे आम्ही जास्तीचे पाणी सोडू देणार नाही. आमच्या हक्काचे पाणी देण्यास आमचा विरोध आहे. पुढील महिन्यात पाण्याचे आणखी बाष्पीभवन झाल्यास पाणी सोडणे शक्य नाही. मे अखेरीस शून्य दिवस पाणीपुरवठय़ाची स्थिती येऊ शकते. याबाबत आपण अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत.

पालकमंत्र्यांचे न ऐकण्याचे पालिकेचे धोरण- बापट
पाणी नियोजनाच्या बैठकीमध्ये पालकमंत्री गिरीश बापट यांनी कालवा दुरुस्तीच्या मुद्दय़ावरून पालिका व महापौर प्रशांत जगताप यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘‘पालकमंत्र्याचे ऐकायचेच नाही, असेच महापालिकेचे धोरण आहे. मागच्या बैठकीमध्ये कालव्याच्या दुरुस्तीसाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे ठरले होते. मेअर, सांगा पाहणी झाली का? ती का झाली नाही? यात पालिकेची बेफिकिरी आहे. गळतीबाबत काहीच केले नाही. त्यातून अडीच टीएमसी पाणी वाया गेले. तुमच्याकडून हे होणार नाही व मीही तुमच्याकडे भीक मागायला येणार नाही. मला पूर्ण जिल्ह्य़ाची काळजी आहे.’’