विरोधकांकडून मुख्य सभेत आंदोलन

महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनावेळी इमारतीमधून पाण्याची गळती झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद गुरुवारी महापालिकेच्या मुख्य सभेत उमटले. सत्ताधारी पक्षाला उद्घाटनाची घाई असल्यामुळेच ही नामुष्की ओढविल्याचा आरोप करत सर्व विरोधी पक्षांनी मुख्य सभेत आंदोलन केले.

शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन महापालिकेच्या कामकाजासाठी बहुमजली इमारत बांधण्यात आली आहे. सुमारे पन्नास कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते गेल्या आठवडय़ात झाले. उद्घाटनाचा कार्यक्रम सुरु असतानाच उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नव्या इमारतीमधून पाण्याची गळती होत असल्याचा प्रकार पुढे आला होता. त्यातच या नव्या इमारतीच्या छपराचा एक भाग पडला असल्याचे उघडकीस आल्यामुळे इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चर्चा सुरु झाली होती. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडून मुख्य सभेत आंदोलन करण्यात आले. नव्या विस्तारित इमारतीच्या कोनशिलेवर नाव येण्यासाठीच उद्घाटनाचा घाट भारतीय जनता पक्षाने घातल्याचा आरोप विरोधी पक्षनेता चेतन तुपे यांनी केला. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीतच हा प्रकार झाल्यामुळे शहराचा नावलौकिक कमी झाला आहे. या प्रकाराला जबाबदार असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी अरविंद शिंदे यांच्याकडून करण्यात आली.

दरम्यान, इमारतीच्या छतावर कचरा अडकल्यामुळे पाणी साठले होते. इमारतीमधून पाण्याची गळती झाली नाही. इमारतीचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला असून अहवालानंतर अधिकारी आणि ठेकेदारांवरील जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाकडून सांगण्यात आले.

(( महापालिकेच्या मुख्य सभेत गुरुवारी विरोधी पक्षांनी आंदोलन केले.