22 November 2017

News Flash

संततधार पावसाने धरणसाठय़ात वाढ

गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठय़ात वाढ होत आहे.

प्रतिनिधी, पुणे | Updated: July 17, 2017 12:37 AM

Pune : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांतीत एकूण पाणीसाठ्यात वाढ.

गेल्यावर्षीच्या तुलनेत अद्यापही पाणीसाठा कमीच

जून महिन्यानंतर पाठ फिरवलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून पुनरागमन केल्याने शहर आणि जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठय़ात वाढ झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी, गेल्यावर्षीच्या तुलनेत अद्यापही पाणीसाठय़ाचे प्रमाण कमीच आहे. चारही धरणांत मिळून साडेअकरा टीएमसी (अब्ज घनफुट) एवढा पाणीसाठा झाला असून मागील आठवडय़ात हेच प्रमाण ८.८ टीएमसी होते.

गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठय़ात वाढ होत आहे. वरसगाव धरणाच्या परिसरात दिवसभरात सुमारे ५६ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे धरणात ३.९५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पानशेत धरणक्षेत्रात सुमारे ६३ मिलिमीटर पाऊस झाल्याने पाणीसाठा मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. या धरणातील आतापर्यंतचा पाणीसाठा ५.९७ टीएमसी एवढा झाला आहे. खडकवासला धरणक्षेत्रात तुलनेने कमी पाऊस झाला आहे. दिवसभरामध्ये १७ मिलिमीटर पाऊस झाल्याने या धरणात ०.७२ टीएमसी पाणीसाठा झाल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे.  पिंपरी-चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दिवसभरात सुमारे १०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणामध्ये ५.०१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शहर आणि जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत आतापर्यंत एकूण ३८.५९ टक्के पाणीसाठा झाला असून मागील आठवडय़ात हेच प्रमाण २७.७२ टक्के एवढे होते. टेमघर धरणात दिवसभरात ६५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मात्र, धरणाचे काम सुरू असल्याने तेथे पाणी साठविण्यात येणार नसल्याचे या आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.

कळमोडी धरण १०० टक्के भरले 

कळमोडी धरणाची पाणीसाठय़ाची क्षमता सुमारे दीड टीएमसी एवढी असून ते धरण शंभर टक्के भरले आहे. सध्या धरणात १.५१ टीएमसी एवढा पाणीसाठा असून धरणक्षेत्रात मान्सून सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे ६८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

धरणांतील सद्य:स्थिती (टक्क्यांमध्ये)

खडकवासला ३६.६५, पानशेत ५६.१०, वरसगाव ३०.८२, टेमघर १६.२१, पवना ५८.८४, भामा आसखेड ५६.५०, चासकमान ६६.९०, गुंजवणी ३५.४५, निरा देवधर ३३.८५, भाटघर ३२.०८ टक्के भरले असून धरणांतील एकूण पाणीसाठा ३८.५९ टक्के एवढा झाला आहे.

First Published on July 17, 2017 12:37 am

Web Title: water levels in dams up due to heavy rains in pune district