23 November 2017

News Flash

पाणी मोजमापाची यंत्रणाच नाही

पावसाळा थोडा लांबला की पाणीकपातीची चर्चा सातत्याने सुरू होते.

प्रतिनिधी, पुणे | Updated: September 14, 2017 4:49 AM

पुणे महानगरपालिका

दरडोई ३०० लीटर पाणी कागदावरच; समान पाणीपुरवठा योजना राबवण्याचे आव्हान

महापालिका नियोजित कोटय़ापेक्षा अधिक पाणी वापरत असल्याबाबत आरोप होत असताना आणि पाटबंधारे-महापालिका यांच्यात पाणी घेण्यावरून दावे-प्रतिदावे होत असले तरी पाण्याचे मोजमाप करणारी कोणतीही यंत्रणा या दोन्ही विभागांकडे नाही. त्यामुळे प्रत्यक्षात धरणातून किती पाणी उचलण्यात आले, त्याचे किती वितरण झाले याची नेमकी माहिती कधीच पुढे येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाण्याच्या वापरावरून आरोप-प्रत्यारोप करून केवळ पुणेकरांची दिशाभूल करण्याचेच काम होत असल्याचेही स्पष्ट झाले असून पाणी चोरी झाकण्यासाठीच हे आरोप होतात का, असा प्रश्नही उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. या परिस्थितीमध्ये महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजना राबविण्याचे आव्हान महापालिकेतील सत्ताधाऱ्यांपुढे असणार आहे.

पावसाळा थोडा लांबला की पाणीकपातीची चर्चा सातत्याने सुरू होते. वास्तविक पुण्यातील पाण्याची परिस्थिती लक्षात घेता प्रती माणशी तीनशे लीटर्स पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रती माणशी १४० लीटर्स पाणी असे मानांकन असतानाही अधिकचे पाणी पुणेकरांना मिळत आहे. महापालिकेतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनही या गोष्टीला दुजोरा देण्यात येत आहे. धरणातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन, पाणी गळती आणि चोरी हे प्रमाण लक्षात घेतल्यानंतरही एवढा मुबकल साठा असतानाही पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे का जावे लागते, हाच मुख्य प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे.

महापालिका धरणातून किती पाणी उचलते, याबाबत पाटबंधारे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने परस्पर दावे करण्यात येतात. मात्र पाण्याचे मोजमाप करणारी कोणतीही यंत्रणा या दोन्ही विभागांकडे नाही. त्यामुळे प्रत्यक्षात किती पाणी उचलण्यात आले, त्याचे वितरण किती आणि कसे झाले, त्यापैकी किती टक्के पाण्याची गळती झाली, याची नेमकी माहिती जाणीवपूर्वक पुढे येऊ दिली जात नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या कालव्यांची दुरुस्ती हा प्रश्नही सातत्याने ऐरणीवर येतो. कालव्यातून जवळपास तीन टीएमसी पाण्याची गळती होत असल्याचे पुढे आले आहे.

त्यानंतरही याचे खापर मात्र पाटबंधारे विभागाकडून पुणेकरांच्या माथी मारण्यात येते. पाण्याचे मोजमाप करणारी कोणतीही यंत्रणा नसतानाही पाटबंधारे विभागाकडून आरोप का होतात, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

धरणातील पाण्याची पळवा-पळवी होत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.

जीर्ण जलवाहिन्या आणि पाणीगळती

पाणीगळती हा पाणीपुरवठय़ातील प्रमुख अडथळा ठरला आहे. सातशे किलोमीटर लांबीच्या जुन्या-जीर्ण जलवाहिन्यांमुळे प्रतीदिन सात टक्के पाणी वाया जात असून गळतीचे एकूण प्रमाण हे चाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. शहरात एकूण दोन हजार ५०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या आहेत. त्यापैकी सातशे ते आठशे किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या हा चाळीस ते पन्नास वर्षे जुन्या आहेत. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या सदाशिव पेठ, कसबा, शुक्रवार, बुधवार पेठ, मंगळवार पेठ, खडकमाळ आळी, रविवार पेठ, शनिवार पेठ, गुरुवार पेठ, रास्ता पेठ, शिवाजीनगर येथील जलवाहिन्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या वाहिन्या दुरुस्ती करण्याच्या नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत.

समान पाणीपुरवठा योजनेचे आव्हान

पाणीकपात करण्यासाठी जलसंपदा विभागाचा आटापिटा सुरू झाला आहे. मात्र त्याचा काही प्रमाणात समान पाणीपुरवठा योजनेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. शहराची २०४७ सालापर्यंतची लोकसंख्या आणि त्यादृष्टीने पाण्याची आवश्यकता पाहून ही योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठीचा बृहत् आराखडाही करण्यात आला आहे. साठवणूक टाक्यांची उभारणी, शंभर टक्के मीटर पद्धतीने पाणीपुरवठा, सोळाशे किलोमीटर लांबीच्या नव्याने जलवाहिन्या टाकण्याची कामे याअंतर्गत होणार आहेत. मात्र राजकीय वादात ही योजना सातत्याने सापडत असल्यामुळे पुणेकरांनाच त्याचा फटका बसणार आहे.

First Published on September 14, 2017 4:49 am

Web Title: water measurement system water resources department pune municipal corporation