मोठा गाजावाजा करत िपपरी-चिंचवड शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्याची सुमारे ५०० कोटी रुपये खर्चाची योजना राबवण्याची घोषणा सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने आठ वर्षांपूर्वी केली, त्या मुद्दय़ाचा वापर गेल्या महापालिका निवडणुकीतही करण्यात आला. यापुढील काळातही ती घोषणा राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात राहणार आहे, असे असताना अद्यापही ही योजना कागदावर राहिली आहे, असा संताप स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे यांनीच मंगळवारी व्यक्त केला.
शहरातील नागरिकांना २४ तास पाणी देण्याची राष्ट्रवादीची योजना आहे, तशी घोषणा करून जवळपास आठ वर्षे झाली आहेत. मात्र, ही योजना मार्गी लागलेली नाही. सद्य:स्थितीत निगडी यमुनानगर प्रभागात प्रायोगिक स्तरावर २४ तास पाणी दिले जात आहे. त्यानंतर, पहिल्या टप्प्यात शहरातील ४० टक्के भागात ही योजना राबविण्यात येणार असून उर्वरित ६० टक्के भागात नंतर अंमलबजावणी होणार आहे. दोन्ही टप्पे मिळून होणारा खर्च ५०० कोटी आहे. मात्र, या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त झाले नाहीत, प्रकल्प अहवाल नाही, अशी परिस्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर, स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावरून शितोळेंनी बराच थयथयाट केला. इतका महत्त्वपूर्ण प्रकल्प असूनही तो अधांतरीच राहिला आहे. भविष्यात शहरवासीयांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यानुसार, आंद्रा धरणातून पाणी आणण्यात येणार आहे. मात्र, पालिकेच्या संथ कारभारामुळे याबाबतची प्रक्रिया रखडली असल्याचे शितोळे यांनी पत्रकारांना सांगितले. शांताराम भालेकर यांनी ‘स्काडा प्रणाली’चा वापर योग्य प्रकारे होत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. आयुक्त फायलींवर सह्य़ा करत नाही, अशी तक्रार विनायक गायकवाड यांनी केली. समाविष्ट गावांत पाण्याची समस्या तीव्र आहे. रावेत येथील बंधाऱ्याचे काम रखडल्याचे बाळासाहेब तरस यांनी सांगितले.
‘नगरसेवकांचा रक्तदाब वाढतोय’
नगरसेवक म्हणून निवडून आलो. मात्र, पाहिजे तशी कामे होत नाहीत. अधिकारी मनमानी करतात, आयुक्त गांभीर्याने घेत नाहीत. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींसाठी आदळआपट करावी लागते, तरीही उपयोग होत नाही. नगरसेवकांचा रक्तदाब दिवसेंदिवस वाढतोय. ‘स्मार्ट सिटी’ व्हावी, मात्र नावापुरते नको, अशी भावना शांताराम भालेकर यांनी व्यक्त केली.