News Flash

दौंड, इंदापूरच्या गरजेपेक्षा चारपट अधिक सोडलेले पाणी गेले कुठे?

खडकवासला धरणातून दौंड, इंदापूरसाठी पाणी सोडण्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनी अनुकूलता दर्शविल्याने सजग नागरिक मंचच्या माध्यमातून पुण्याच्या पाण्याविषयी पालकमंत्र्यांसाठी विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

– पुण्याच्या पाण्याबाबत पालकमंत्र्यांना विविध प्रश्न
– पिण्यालाच हवे असेल, तर रेल्वेने पाणी पाठवा
एक दिवसाआड पाणीकपात करून पुणेकरांनी पाणी वाचविले असताना खडकवासला धरणातून दौंड, इंदापूरसाठी पाणी सोडण्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनी अनुकूलता दर्शविल्याने सजग नागरिक मंचच्या माध्यमातून पुण्याच्या पाण्याविषयी पालकमंत्र्यांसाठी विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ऑक्टोबर-जून या काळातील दौंड, इंदापूरची पिण्याच्या पाण्याची गरज प्रत्येकी ०.३ टीएमसी (अब्ज घनफूट) असताना त्याच्या चारपट पाणी गेल्या सहा महिन्यात सोडण्यात आले. त्याचे काय झाले, याचा हिशेब मागितला का, असा प्रमुख प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दौंडला पिण्यासाठीच पाणी हवे असेल, तर ते रेल्वेनेही पाठवता येईल, असेही मंचने स्पष्ट केले.
सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी याबाबत बापट यांना पत्र दिले असून, पाण्याविषयी पुणेकरांच्या विविध प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. मागील वर्षी पाऊस कमी पडणार असल्याचे स्पष्ट असताना पुण्यात पाणी कपातीला आपण अक्षम्य उशीर केला, त्याचे परिणाम पुणेकर मागील आठ महिने पाणीकपात सहन करून भोगत आहेत. ७५ टक्के पाणीकपात सहन करणाऱ्या पुणेकरांना आणखी पाण्याची बचत करायला सांगून जखमेवर मीठ चोळले जात असल्याचे पत्रात म्हटले आहे.
कालव्यातून इंदापूरला पाणी पोहोचेपर्यंत दीड टीएमसी, तर दौंडपर्यंत एक टीएमसी पाण्याची गळती होते. आता त्यांना एक टीएमसी पाणी हवे असल्यास अडीच टीएमसी पाणी सोडावे लागते, तितके पाणी धरणात आहे का? इंदापूर भोगोलिकदृष्टय़ा उजनीच्या जवळ असताना त्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज उजनीच्या अचल साठय़ातून भागवता येणार नाही का? दौंडला पाणी पोहोचेपर्यंत होणारी गळती लक्षात घेता रेल्वेने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा विचार केला आहे का? मागील वर्षीच्या कालवा समितीच्या बैठकीत जुलै २०१६ पर्यंतच्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असताना ते केले का? ते कोठे फसले, याचा अभ्यास केला का? खडकवासलापासून पर्वतीपर्यंत कालव्यातून १.५० टीएमसी पाण्याची गळती होते, ही जबाबदारी पालिकेची की पाटबंधारे खात्याची? या कालव्याच्या दुरुस्तीसाठी आपण पाटबंधारे खात्याकडून काय प्रयत्न केले? आदी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
दुष्काळामुळे पुणेकर पाणीकपात निमूटपणे सहन करीत आहेत. याचा अर्थ मनमानी पद्धतीने आणखी कपात लादू शकतो, असा भ्रम असेल तर विधानसभेत शतप्रतिशत आमदार निवडून देणारे पुणेकर येत्या पालिका निवडणुकीत भाजपला घरी बसवू शकतात, याची जाणीव ठेवून निर्णय घ्याल, अशी अपेक्षाही पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
लवासाच्या धरणातील पाण्याचे काय?
पुण्याला पाण्याची गरज असताना लवासाच्या धरणात असलेले पाणी पुण्यासाठी सोडण्याचा करार पूर्वीच झालेला आहे. या कराराबाबत पालकमंत्र्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना गेल्या तीन महिन्यामध्ये दोनदा लक्षात आणून देण्यात आले आहे. त्या बाबतीत आपण काय केले, असाही प्रश्न सजग नागरिक मंचने गिरीश बापट यांना दिलेल्या पत्रात केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 3:13 am

Web Title: water problem raise question
Next Stories
1 राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या आवारातील गवताला आग
2 बालगंधर्वमध्ये पोलीस छावणीत कन्हैयाकुमारची सभा
3 राष्ट्रवादावर चर्चेसाठी तुम्हाला निवडून दिलेले नाही, कन्हैयाची पुन्हा मोदींवर टीका
Just Now!
X