यंत्रणाच अस्तित्वात नाही; पाणी आज दौंडला पोहोचणार
दौंड व इंदापूरला पिण्याच्या पाण्यासाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आले असून, कालव्यातून पाण्याची चोरी होऊ नये म्हणून मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी कालव्यातून मोठय़ा प्रमाणावर पाणी झिरपून परिसरातील विहिरींमध्ये जात असल्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे, असे स्थानिक मंडळी सांगतात. या पाण्याचा पिण्याशिवाय शेतीलाही उपयोग होण्याची शक्यता असतानाही या पाण्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा नसल्याचे सध्याचे चित्र
आहे. दरम्यान, खडकवासल्यातून सोडलेले पाणी शनिवारी दौंडला पोहोचणार आहे.
कालव्याने पाणी सोडण्यास पुणेकरांचा विरोध असतानाही ४ मे रोजी दौंड व इंदापूरला खडकवासल्यातून पाणी सोडण्यात आले. पाणी सोडण्यात आल्यानंतर कालव्यातून पाणी झिरपत असते. याबाबत पाटबंधारे खात्यालाही कल्पना आहे. झिरपलेले पाणी कालव्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंतच्या विहिरींमध्ये जाऊ शकते. त्याचप्रमाणे बंद पडलेल्या कूपनलिकांनाही पाणी लागते. त्यामुळे ज्या भागात पाण्याची टंचाई आहे व स्वत:ची पाणी योजना नाही, अशा नागरिकांना पिण्यासाठी या पाण्याचा फायदा होतो, ही बाब स्थानिक मंडळींनी स्पष्ट केली. मात्र, कालव्यामुळे भरलेल्या विहिरीतील पाण्याचा वापर शेतीसाठीही होऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नसल्याचेही काहींनी नमूद केले.
पाणी सोडण्यास झालेला विरोध व पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता कालव्यावर मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

‘प्रशासनाने लक्ष घालावे’
परिसरातील वीज बंद करण्यात आली असून, पंपाने पाण्याचा उपसा होणार नाही, यासाठी पाहणी केली जात आहे. त्यासाठी सहा टप्प्यांवर वेगवेगळी पथके कार्यरत आहेत. यंदा प्रथमच असा अभूतपूर्व बंदोबस्त पहायला मिळत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. कालव्यामुळे भरणाऱ्या विहिरींचे पाणी पिण्यालाच जाणार की त्याचा उसासाठी वापर केला जाणार यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नाही. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात येत आहे.