|| चिन्मय पाटणकर

पुणे : के ंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत विकास कामे सर्वांत पहिल्या औंध-बाणेर परिसरात सुरू करण्यात आली. मात्र औंध-बोपोडी प्रभागातील बोपोडी परिसर या विकास कामांपासून वंचितच राहिला. वाहतूककोंडी, पाणीपुरवठ्यातील अनियमितता, सांडपाणी वाहिन्यांचा अभाव तसेच कचऱ्यामुळे होणारी अस्वच्छता, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव अशा समस्या औंध-बोपोडीच्या या प्रभाग क्रमांक ८ मध्ये कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा प्रभाग स्मार्ट विकासाच्या कोंडीत अडकल्याची वस्तुस्थिती आहे.

पुण्याच्या पश्चिमेकडील संपन्न भाग असलेले औंध आणि त्या पुढे झोपडपट्टीसह मिश्र वस्ती असलेला बोपोडी परिसर मिळून औंध-बोपोडी हा प्रभाग क्रमांक ८ तयार झाला आहे. या प्रभागात सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे,  प्रकाश ढोरे हे नगरसेवक भाजपचे आहेत. विजय शेवाळे यांचे निधन झाल्याने त्यांची जागा रिक्त आहे.

झोपडपट्टी, गावठाण, सोसायट्या, बंगले अशा सर्व आर्थिक, सामाजिक स्तरातील नागरिक या प्रभागात राहतात. पायाभूत सुविधांची कामे करणे ही नगरसेवकांची जबाबदारीच आहे. त्यामुळे मैलापाणी वाहिन्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची वाहिनी, रस्त्यांची डागडुजी आदी कामे होत असतात. पण पूर्वी सुरू के लेले प्रकल्पही पूर्ण होणे आवश्यक होते, ती कामे पूर्ण झालेली नाहीत. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत विकसित झालेला काही भाग आणि या विकासाचा मागमूसही नसलेला भाग असा विरोधाभास या प्रभागात दिसून येतो.

मुंबई-पुणे रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. तसेच ब्रेमेन चौक, परिहार चौकात नेहमीच वाहतूक कोंडी, गर्दी होत असते. त्यामुळे या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सोपवण्यासाठी समतल विभाजक (ग्रेड सेपरेटर) होण्याची आवश्यकता होती. पाण्याच्या टाकीचे काम अपूर्णावस्थेत आहे. बोपोडी पुलाचे कामही झालेले नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. भाजपची महापालिके त पूर्ण सत्ता असूनही काही नवीन प्रकल्प प्रभागात आले नाहीत. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत झालेली कामे औंधमध्ये झाली, पण बोपोडीमध्ये झाली नाहीत. त्याशिवाय विकास कामांच्या नावाखाली सुभोभीकरणावर आणि पदपथ रुंद करण्यावर भर देण्यात आला. अन्य मूलभूत सुविधांची कामे झाली नाही. अनधिकृत बांधकामे, पथारीवाल्यांनी व्यापलेले रस्ते हे शहरातील अन्य भागातील प्रश्न या प्रभागातही आहेतच, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागरिक म्हणतात

बोपोडीमध्ये कचऱ्याची समस्या गंभीर आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. रस्त्यावरील खड्डे, नदीपात्रात फेकला जाणारा कचरा, महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा, वाहतूक कोंडी, पीएमपीच्या बस थांब्यांची दयनीय झालेली अवस्था अशा बऱ्याच समस्या आहेत. या भागात मुलांसाठी मोकळे क्रीडांगणही नाही. – सुलभा चव्हाण, बोपोडी

औंध भागात विशेष दैनंदिन समस्या नाहीत. मूलभूत समस्यांबाबत नगरसेवकांशी संपर्क साधल्यास ती कामे होतात. स्मार्ट सिटीअंतर्गत रस्ते अरुंद करून पदपथ अनावश्यक रुंद के ले जात आहेत, ही या भागाची मोठी अडचण आहे. के ंद्र सरकारच्या योजनेच्या नावाखाली नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनधिकृत बांधकामांची समस्या आहे. – हर्षकु मार बंब, औंध

राजकीय प्रतिनिधी म्हणतात

नगरसेवकांनी काही कामे केली आहेत. पण संजय गांधी रुग्णालय, मुंबई-पुणे रस्त्याचे विस्तारीकरण, हॉकी स्टेडियमचे काम प्रलंबितच आहे. मैलापाणी वाहिनी, कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने होणारी अस्वच्छता असे प्रश्न आहेत. नगरसेवकांनी कोणताही नवीन प्रकल्प प्रभागात आणला नाही. मात्र जुन्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातो. – राजेंद्र भुतडा, काँग्रेस

विद्यमान नगरसेवकांनी गेल्या चार वर्षांत एकही नवीन प्रकल्प आणलेला नाही. प्रभागातील नागरिकांच्या गरजा त्यांना कळल्या नाहीत. निधीचा कशासाठी वापर केला हा प्रश्न आहे. आधीचे प्रलंबित प्रकल्पही या नगरसेवकांनी पूर्ण केले नाहीत. आधीच्या पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे श्रेय द्यावे लागेल, म्हणून तेही प्रकल्प रखडलेले आहेत.  – श्रीकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभागातील समस्यांचा लेखाजोखा

’ महापालिके च्या गेल्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी नागरिकांना भरघोस आश्वासने दिली होती. या आश्वासनांचे काय झाले, कोणती कामे झाली, कोणत्या योजना प्रत्यक्षात आल्या, याचा आढावा ‘प्रभागाचे प्रगतिपुस्तक’ या वृत्तमालिके तून दररोज घेतला जात आहे.

’ प्रभागांमधील नागरिकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रभागाचे नगरसेवक काय करत आहेत, गेल्या साडेतीन वर्षांत कोणत्या समस्या सुटल्या, कोणती कामे रखडली, कोणती कामे झाली याची सविस्तर माहिती या वृत्तमालिके तून देण्यात येत आहे. वृत्तमालिका सुरू झाल्यानंतर नागरिकांकडून त्याला प्रतिसाद मिळत असून विविध प्रभागांतील नागरिकांनी त्यांना दैनंदिन भेडसाविणाऱ्या समस्या कळविल्या आहेत. यातील काही निवडक समस्यांची माहिती या सदरातून प्रसिद्ध के ली जात आहे.’ नागरिकांनी आपल्या भागातील समस्या, प्रश्न पुढील ई-मेल lokpune4@gmail.com मे वर पाठवावेत. समस्यांचे छायाचित्रही पाठविता येईल. आपले नाव आणि संपर्क क्रमांकही अवश्य द्यावा.

लोकप्रतिनिधी म्हणतात

आयटीआय रस्त्यावर खुली व्यायामशाळा सुरू केली. सांस्कृतिक भवन, इनडोअर स्पोर्ट कॉम्प्लेक्स, नदी सुधारप्रकल्पाअंतर्गत नागरिकांना चालण्यासाठी ट्रॅकचे काम लवकरच पूर्ण होईल. प्रभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टे, विरंगुळा केंद्र तयार केले. औंध गावात साडेतीन कोटी खर्च करून पाण्याच्या वाहिन्या, सांडपाणी वाहिन्या, काँक्रिट रस्ते अशी कामे केली.  पाण्यासाठीच्या स्वतंत्र वाहिनीचे काम सुरू आहे. सांगवीकडून येणाऱ्या रस्त्यावरील पुल रुंद करण्याचे काम चालू आहे. – अर्चना मुसळे, नगरसेविका

प्रभागात सुशोभीकरण, मैलापाणी वाहिनी, पाण्याची वाहिनी, रस्त्यांवरील दिव्यांची कामे झाली. वसाहतींमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात आली. नागरिकांसाठी व्यायामशाळा, समाज मंदिरे बांधण्यात आली. प्रभागातील शाळांना निधी उपलब्ध करून दिला. विपश्यना केंद्र आणि अभ्यासिकेचे काम लवकरच पूर्ण होईल. पाण्याच्या टाकीचे कामही लवकरच सुरू होईल. गेल्या चार वर्षांत समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांसाठी काम करण्याचा प्रयत्न गेला आहे. – सुनीता वाडेकर, नगरसेविका

नागरिकांसाठी करोना रुग्णालय उभारल्याने नागरिकांची सोय झाली. पुढील तीनचार महिन्यांत प्रसूतिगृहाचे काम पूर्ण होईल. समाज मंदिरे, मैलापाणी वाहिनी, पिण्याच्या पाण्याची वाहिनी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, जॉगिंग ट्रॅक अशा अनेक सुविधा केल्या. स्पर्धा परीक्षा केंद्रात आवश्यक सुविधा दिल्या.  हॅरिस पुलाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचे नियोजित आहे. – बंडू ढोरे, नगरसेवक

नगरसेवकांचे दावे

स्मशानभूमी, समाज मंदिर, स्वच्छतागृहे

खुली व्यायामशाळा, विरंगुळा केंद्रांची उभारणी

रस्त्यांचे डांबरीकरण-काँक्रिटीकरण,

मैलापाणी-पावसाळी वाहिन्यांची कामे

पायाभूत सुविधांची कामे

तक्रारींचा पाढा

पदपथांवर अतिक्रमणे

वाहतूक कोंडी

विस्कळीत पाणीपुरवठा

अपुऱ्या पायाभूत सुविधा

कचरा वेळेत न उचलला जाणे

प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे

औंध गावठाण, बोपोडी गावठाण, आयटीआय रस्ता, ब्रेमेन चौक,  विधाते वस्ती, भाऊ पाटील रोड, स्पायसर परिसर, मुंबई-पुणे रस्ता