News Flash

पावसातही पाणीटंचाई

पुणे जिल्ह्य़ात ३१, तर विभागात ७५ टँकरने पाणीपूरवठा

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पुणे जिल्ह्य़ात ३१, तर विभागात ७५ टँकरने पाणीपूरवठा

राज्यात मोसमी पाऊस दाखल झाला असून पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. मोसमी पाऊस सुरू झाला असला तरी अद्यापही जिल्ह्य़ासह विभागात तब्बल ७५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्य़ातील भोर, पुरंदर, आंबेगाव, बारामती, खेड, मुळशी, दौंड, जुन्नर आणि वेल्हा अशा नऊ तालुक्यांमध्ये ३१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तर पुणे विभागातील सातारा आणि सांगली जिल्ह्य़ांमध्ये अनुक्रमे ४१ आणि तीन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

विभागामध्ये ११ जूनअखेर ३४३ वाडय़ा, ८९ गावांमधील १ लाख २९ हजार ७५ नागरिक आणि १३ हजार ४१३ जनावरांना शासकीय २२ आणि खासगी ५३ अशा एकूण ७५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून पाऊस लांबल्यास किंवा खंड पडल्यास टँकरची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्य़ातील भोर, पुरंदर, आंबेगाव, बारामती, खेड, मुळशी, दौंड, जुन्नर आणि वेल्हा अशा नऊ तालुक्यांमध्ये २०८ वाडय़ा, एकतीस गावांमधील ५९ हजार ९७४ बाधित नागरिकांना दहा शासकीय आणि एकवीस खासगी अशा एकतीस टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्य़ात सव्वीस विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्य़ातील खानापूर तालुक्यामध्ये एक वाडी, पाच गावांमधील सहा हजार ७८२ बाधित नागरिकांना तीन शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर, दोन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्य़ातील खटाव, माण, कोरेगाव, पाटण, महाबळेश्वर, खंडाळा, जावळी, वाई, फलटण आणि कराड दहा तालुक्यांमधील १३२ वाडय़ा, ५३ गावांमधून ६१ हजार ६४८ नागरिक आणि १३ हजार १२३ जनावरे बाधित झाली आहेत. या ठिकाणी नऊ शासकीय, तर बत्तीस खासगी अशा एकूण ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर, ४६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत विभागातील सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्य़ात एकाही टँकरची मागणी नसल्याचे त्या ठिकाणी पाणीटंचाईसदृश परिस्थिती नसल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु, कोल्हापूर जिल्ह्य़ात ६७१ नागरिक आणि २९० पशुधन बाधित झाले आहे. या जिल्ह्य़ात दोन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पावसाने विश्रांती घेतल्यास किंवा पाऊस लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही विभागीय आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्य़ात ३१ टँकर

पुणे जिल्ह्य़ात एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात पुरंदरमधील चार हजार ८१९ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, मे अखेरीस भोरमध्ये दोन, आंबेगावात आठ, बारामती आणि खेड  प्रत्येकी तीन, जुन्नरमध्ये चार, दौंड आणि वेल्हा प्रत्येकी एक अशा आठही तालुक्यांमध्ये पंचवीस टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, ११ जूनअखेर भोर, पुरंदर आणि बारामती प्रत्येकी तीन, आंबेगाव आणि जुन्नर प्रत्येकी सात, खेड पाच, दौंड आणि मुळशीमध्ये प्रत्येकी एक अशा ३१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 12:30 am

Web Title: water scarcity 3
Next Stories
1 सुविधा, सुरक्षितता आणि दिरंगाई
2 मनोहर भिडे यांनाच मुलं झाली नाहीत तर त्यांच्या आंब्याने काय मुलं होणार – बच्चू कडू
3 संभाजी भिडेंवर कायदेशीर कारवाई करा, अंनिसची मागणी
Just Now!
X