शहरात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईची भीती सर्वानाच वाटते, मात्र आज तर चक्क महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये पाणी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे,आणि आपल्या कामकाजासाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाले. आज सकाळ पासून ते दुपारी १ वाजेपर्यंत महानगर पालिकेच्या मुख्य इमारतीत पाणी नव्हते. मात्र सर्वांच्या तक्रारी आल्यानंतर अ आणि फ या प्रभागातील टँकरला पाचारण करून पाणी पुरवठा केला. उन्हाळा सुरू होण्याअगोदरच पिंपरी-चिंचवडला पाणी टंचाईचे ग्रहण लागले. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या रावेत बंधाऱ्यावरील पंपींग स्टेशनवर गुरुवारी दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे शहरात पाणी पुरवठा कमी दाबाने सुरू झाला.

काही ठिकाणी दिवसभर पाणी पुरवठा झालाच नाही. तर महापालिकेच्या इमारतीमध्ये आज पाणी पुरवठा होऊच शकला नाही. सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत पाणीपुरवठा महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये झालाच नाही. महापालिका कर्मचाऱ्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर त्या विभागाला जाग आली. आणि अ आणि फ क्षेत्रीय कार्यालयातील टँकरने दुपारनंतर पाणीपुरवठा सुरू करण्याची नामुष्की पाणीपुरवठा विभागावर ओढवली. महापालिकेच्या मुख्य इमारतीसह शहरात उद्यापासून पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी दिली.