News Flash

जलउदासीनता!

घटत्या साठय़ातही पाण्याचा अनिर्बंध वापर; बांधकामांसाठीही उधळपट्टी

घटत्या साठय़ातही पाण्याचा अनिर्बंध वापर; बांधकामांसाठीही उधळपट्टी

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणीसाठय़ाने तळ गाठण्यास सुरुवात केलेली असताना धरणातील पाण्याचा अनिर्बंध वापर विविध कारणांसाठी होत आहे. जलकेंद्रात येणारे पाणी टँकरच्या माध्यमातून बांधकामांसाठी वापरले जात आहे. धरणातील पाणीसाठा कमी होण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बांधकामांना पाणीपुरवठा करण्यास, तसेच उद्याने, वॉशिंग सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र यंदा प्रशासनाकडून तसे कोणतेही आदेश काढण्यात आलेले नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर अन्य कारणांसाठी सर्रास होत असल्याचे चित्र आहे.

शहराचा पाणीपुरवठा खडकवासला साखळी प्रकल्पातील वरसगांव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांवर अवलंबून आहे. यातील सर्वाधिक क्षमता असलेले वरसगाव आणि टेमघर धरण दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात आले आहे. या परिस्थितीत सध्या केवळ खडकवासला आणि पानशेत या दोन धरणांवरच पुणे शहराची भिस्त आहे. त्यातही खडकवासला धरणाची साठवणूक क्षमता जेमतेम दोन टीएमसी आहे. वरसगांव आणि टेमघर धरण रिकामे करण्यात आल्यामुळे धरणातील पाणीसाठा एप्रिल महिन्यापासून झपाटय़ाने कमी होण्यास सुरुवात झाल्यानंतर पंधरा जुलैपर्यंतच्या पाण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले. सध्या हा पाणीसाठा झपाटय़ाने कमी झाला आहे. या परिस्थितीमध्ये पाणीकपाती सारखा व्यावहारिक निर्णय घेण्याऐवजी पाऊस येईल, या अपेक्षेवर महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

शहराचा पाणीपुरवठा सध्या केवळ पानशेत या एकमेव धरणावर अवलंबून असताना आणि या धरणातील पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात केली असतानाही पाणीपुरवठय़ाच्या संभाव्य धोक्याची जाणीव महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाला झालेली नाही. राज्याच्या पाटबंधारे आणि जलसंपदा विभागाने वारंवार पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिल्यानंतरही पाऊस पडेल, या अपेक्षेवर पाणी नियोजनाच्या दृष्टीने अद्याप कोणतीही कार्यवाही महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. पाऊस आणखी लांबला तर पाण्याचे काय करायचे, हा प्रश्न निर्माण झाला असून सत्ताधाऱ्यांच्या गाफीलपणाचा फटका पस्तीस लाख पुणेकरांना बसण्याची शक्यता आहे.

पाऊस लांबला तर पुणेकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे. पिण्याच्या पाण्याचा नाहक अपव्यय होत असल्याचेही दिसून येत आहे. दरवर्षी पावसाचा अंदाज व्यक्त झाल्यानंतर ठोस उपाययोजना महापालिका प्रशासनाकडून केल्या जातात. यंदा मात्र कोणत्याही उपाययोजना प्रशानसाकडून करण्यात आलेल्या नाहीत. धरणातील पाणी कमी होण्यास सुरुवात झाल्यानंतर बांधकामांना पाणी पुरवठा करण्यास, उद्याने, वॉशिंग सेंटरमध्ये गाडय़ा धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई केली जाते. या वेळी तसे कोणतेही आदेश काढण्यात आलेले नाहीत. एरवीही धरणातील पाण्याची मोठय़ा प्रमाणावर चोरी होते. जलकेंद्राच्या माध्यमातून टॅंकर लॉबी पाण्याचा काळाबाजार करते. या टँकरच्या माध्यमातून सध्या बांधकामांना पाणीपुरवठा होत आहे. पण प्रशासनाकडून त्याकडे काणाडोळा करण्यात येत आहे. पाणी टँकरच्या माध्यमातून बांधकामांना उपलब्ध करून देण्यात येत असतानाही त्यावर कारवाई झालेली नाही. किती जणांवर कारवाई झाली, याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही.

प्रशानसाची भिस्त पावसावर

यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता पाण्याच्या गैरवापराला मनाई करणारे परिपत्रक काढण्यात आले नसल्याची माहिती देण्यात आली. टेमघर धरण दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात आले असले तरी धरणांच्या क्षेत्रात पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे टेमघर धरण भरण्यास सुरुवात झाली आहे. धरणातील पाणीसाठा कमी होत असला तरी सद्य:स्थितीमध्ये पाण्याचे नियोजन झाले असून पुणेकरांना पाणी कमी पडणार नाही. तसेच हवामान विभागानेही येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे धरणे भरण्यास सुरुवात होईल, असा दावा पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 12:07 am

Web Title: water scarcity in pune 10
Next Stories
1 धरणक्षेत्रात पावसाची दडी
2 ‘पंढरीची वारी’ आता जगाच्या व्यासपीठावर
3 शहरबात पिंपरी : पुढचं पाठ, मागचं सपाट!
Just Now!
X