पोलीस वसाहतीतील पाणीपुरवठा बंद; महिलांनी रस्ता रोखला; पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

ऐन नवरात्रोत्सवात शिवाजीनगर पोलीस वसाहतीत पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ झाला. मागील तीन दिवस पाणी बंद असल्याने वसाहतीतील रहिवाशी हवालदिल झाले. रविवारी रहिवाशांचा विशेषत: महिलांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला. त्याचप्रमाणे वसाहती समोर मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारानजीक रहिवाशांकडून रस्ता रोखून धरण्यात आला.

शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील चाळी, इमारतींना दररोज एक वेळ तासभर पाणीपुरवठा केला जातो. वसाहतीत साधारणपणे दीड ते दोन हजार रहिवासी आहेत. मागील तीन दिवसांपासून पाणीच येत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. त्याचप्रमाणे अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, ही नित्याची समस्या आहे. अवघे पाच मिनिटेच पाणी मिळत होते. या सर्व प्रकारांनी वसाहतीतील महिलांचा संयम रविवारी सुटला. त्यांनी थेट रस्त्यावर येऊन पालकमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढून तेथे निदर्शने केली. ऐन सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा होत नसल्याची बाब संतप्त महिलांनी बापट यांच्या निदर्शनास आणून दिली. बापट यांनी पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. याबाबत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सूचना देऊन सायंकाळपर्यंत वसाहतीत टँकरने पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन दिले.

दरम्यान, वसाहतीतील रहिवाशांनी सकाळी मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सकाळी अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. पाटबंधारे विभागाने खडकवासला येथील धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या यंत्रणेतील एक पंप बंद केल्याने एसएनडीटी पाणीपुरवठा केंद्राला कमी दाबाने पाणी मिळत आहे. त्यामुळे गोखलेनगर, जनवाडी, शिवाजीनगर पोलीस वसाहत, शिवाजीनगर गावठाण भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

पोलीस वसाहतीत कायमस्वरूपी पाणीकपात

शिवाजीनगर वसाहतीत दीड ते दोन हजार रहिवासी राहायला आहेत. वर्षभरापूर्वी शिवाजीनगर वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. त्या वेळी रहिवाशांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. वसाहतीतील रहिवाशांना साधारणपणे दोन तास पाणीपुरवठा होतो. शहराच्या अन्य भागात पाणीपुरवठा होतो. मात्र, शिवाजीनगर पोलीस वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा ही बाब नित्याची झाली असल्याची प्रतिक्रिया रहिवाशांकडून करण्यात आली.

काँग्रेस-मनसेकडून टँकरने पाणीपुरवठा

शहर युवक काँग्रेसच्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस वसाहतीमध्ये पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले. याशिवाय भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनीही टँकर उपलब्ध करून या वसाहतीमधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.