|| प्रथमेश गोडबोले

जूनअखेर काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांपैकी वरसगाव धरण एप्रिल महिन्यात गळतीच्या कामासाठी रिकामे करण्यात आले. या धरणाचे पाणी पानशेत आणि खडकवासला धरणात वर्ग करण्यात आले आहे. धरणाची कामे जून उजाडला तरी अद्यापही सुरूच असून जूनअखेपर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, पाऊस सुरू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे काम करता येणार नसल्याचे स्पष्टीकरण ठेकेदाराने दिले आहे.

वरसगाव धरणाची क्षमता १३.२० टीएमसी एवढी आहे. मागील वर्षी झालेला दमदार पाऊस आणि परतीच्या पावसामुळे वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तीनही धरणे शंभर टक्के भरली होती. टेमघर धरणाची दुरूस्ती सुरू असल्याने या धरणात मागील वर्षी पाणी साठविण्यात आले नव्हते. वरसगाव धरण गळतीच्या कामांसाठी एप्रिलमध्येच रिकामे करण्यात आले असून तेव्हापासून गळती रोखण्याची कामे सुरू आहेत. वरसगाव धरणाची गळती थांबविण्याची कामे ग्राउटिंग पद्धतीने सध्या सुरू आहेत. ही कामे ७५ टक्के पूर्ण करण्यात आली असून जूनअखेपर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, या दरम्यान पाऊस सुरू झाल्यास कामे करता येणार नसल्याचे स्पष्टीकरण धरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने मंगळवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिले.

एप्रिल महिन्यापासून धरण गळतीच्या कामांना सुरूवात करण्यात आली असून धरण रिकामे करण्यात आले आहे. गळती थांबवण्यासाठी ग्राउटिंगची कामे सुरू आहेत. ७५ टक्के कामे पूर्ण झाली असून केवळ २५ टक्के काम बाकी आहे. ग्राउटिंगची कामे आणि त्यांना मदतनीस अशा प्रत्येक कामांसाठी प्रत्येकी दोन अशाप्रकारे एकूण पस्तीस कामगार दिवस-रात्र गळती थांबविण्याचे काम करत आहेत. जुलैअखेपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. मात्र, पाऊस सुरू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे काम करता येणार नाही, असे ठेकेदाराने स्पष्ट केले आहे.

वरसगाव धरणात नियमित देखभाल दुरूस्तीची कामे सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ही नैमित्तिक कामे करण्यात येत आहेत. पाण्याच्या दबावाने सिमेंट निघून जाऊन गळती होण्याची शक्यता गृहीत धरुन कामे करण्यात येत आहेत. धरणात साठवलेले पाणी अन्य धरणात वर्ग करुनच कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे या कामांचा पाणीसाठय़ावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही.   – ता. ना. मुंडे, मुख्य अभियंता, जलसंपदा पुणे विभाग