आयुक्त, लोकप्रतिनिधींवर नागरिकांकडून प्रश्नांची सरबत्ती

स्मार्ट सिटीचा हेतू, विकासकामांचे नियोजन, भविष्यात होणारे शहरातील बदल आदी विविध मुद्दय़ांवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रविवारी सुमारे अडीच तास नागरिकांशी संवाद साधला. या वेळी नागरिकांनी आयुक्त तसेच लोकप्रतिनिधींवर प्रश्नांची सरबत्ती केली. पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या पाहता, स्मार्ट सिटीचे राहू द्या. पिण्याच्या पाण्याचे काय ते सांगा, असे विविध मुद्दे नागरिकांनी या वेळी उपस्थित केले.

पिंपळे सौदागर येथील नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनच्या वतीने स्मार्ट सिटीचे सादरीकरण व आयुक्तांशी संवाद या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आमदार लक्ष्मण जगताप होते. सहशहर अभियंता राजन पाटील, संगणक विभागाचे प्रमुख नीलकंठ पोमण, नगरसेवक शत्रुघ्न काटे, निर्मला कुटे आदी उपस्थित होते.

पिंपळे सौदागरला गोविंद गार्डन येथे झालेल्या या कार्यक्रमात आयुक्तांनी स्मार्ट सिटी तसेच पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर (मॉडेल वॉर्ड) या भागात होणाऱ्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली. नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आयुक्त हर्डीकर तसेच आमदार जगताप यांनी उत्तरे दिली. पाण्याची ४० टक्के गळती होत असून त्याचे प्रमाण कमी करण्याचे तसेच शहरात समान पाणीपुरवठय़ासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

नागरिकांच्या मागण्या

पिण्याच्या पाण्याची समस्या तातडीने सोडवा, पिंपळे सौदागरला पोस्टाचे कार्यालय सुरू करा, अतिक्रमणे तसेच खाण्याची छोटी-मोठी दुकाने हटवा, आठवडा बाजार बंद करा, सुसज्ज रूग्णालय तसेच ग्रंथालय सुरू करा, वाहनतळाची समस्या दूर करा, पाण्याच्या टाकीचे काम त्वरित पूर्ण करा, बेकायदा बांधकामांना पाठबळ देऊ नका, आयुक्तांनी नागरिकांच्या भेटीसाठी वेळ द्यावा, अशा विविध मागण्या नागरिकांनी या वेळी केल्या.