महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या (महाराष्ट्र वॉटर र्सिोसेस रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी – एमडब्लूआरआरए) आदेशाचे पुणे महापालिकेकडून अद्यापही पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेकडून दरडोई ३५६ लिटर पाणी देण्यात येत आहे. परिणामी, जलसंपदा विभागाकडून जुलैपर्यंत करण्यात येणारे पाण्याचे नियोजन लांबणीवर पडले आहे.

खडकवासला धरण प्रकल्पात सोमवापर्यंत केवळ १८.२६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीपेक्षा तब्बल पाच टीएमसी पाणीसाठा कमी आहे. महापालिकेकडून सध्या १३५० दशलक्ष लिटर पाण्याचा वापर केला जात आहे. पालिकेकडून दररोज एवढेच पाणी वापरले गेल्यास १५ जुलैपर्यंत धरणांमध्ये पाणीच शिल्लक राहणार नाही, एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच उन्हाळ्यात शेती आणि ग्रामीण भागाला पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होऊ शकणार नाही, असा इशारा जलसंपदा विभागाने यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे पालिकेने ११५० दशलक्ष लिटर पाणी वापरावे, अशी सूचना दोन वेळा पत्र पाठवून जलसंपदा विभागाने पालिकेला केली आहे. परंतु, याबाबत अद्यापही अंमलबजावणी होत नसल्याने जलसंपदा विभागाकडून जुलैपर्यंतचे नियोजन लांबणीवर पडले आहे. त्यावर कोणताही निर्णय होत नसल्याने जलसंपदा विभागाला पाण्याचे नियोजन करताना अनेक अडचणी येत आहेत.

दरम्यान, गेल्या आठ वर्षांत २०१५ वगळता खडकवासला धरण प्रकल्पात सर्वात कमी पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागाकडून १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन केले जाते. १५ जुलैपर्यंत पाऊ स न झाल्यास १५ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणात ठेवावा लागतो. त्यामुळे १५ जुलैनंतरही धरणात दोन ते अडीच टीएमसी पाणीसाठा असणे आवश्यक आहे. परंतु, पिण्यासाठी, शेतीसाठी आणि बाष्पीभवन, पाणीचोरी गृहीत धरता सद्य:स्थितीत धरणातील पाणी कमी आहे. सध्या खडकवासला धरणात १.१६ टीएमसी, पानशेत ७.२८ टीएमसी, वरसगाव ९.६९ टीएमसी आणि टेमघरमध्ये ०.१३ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.

पाण्याचा अधिक वापर

सन २०१६ मध्ये २४ डिसेंबरला धरणांमध्ये २२.४९ टीएमसी, २०१७ मध्ये २२.९६ पाणीसाठी होता, तर २०१८ मध्ये १८.२६ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. २४ डिसेंबर २०१५ रोजी धरणांमध्ये १२.८८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्या वेळी पालिकेकडून दरडोई ३०३ लिटर पाणी दिले जात होते. परंतु, २०१८ मध्ये दरडोई ३५६ लिटर पाणी वापरले जात आहे. २४ डिसेंबर २०११ रोजी धरणात केवळ १९.७२ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. त्या वेळीही पाण्याचा वापर काटकसरीने करण्यात आला होता.