News Flash

धरणांमधील कमी साठय़ामुळे पाणी संकटाचे चित्र स्पष्ट

परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे धरणांमध्ये ९० टक्के एवढाच पाणीसाठा यंदा झाला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वरसगाव आणि पानशेत धरणांमधील पाणीसाठा घटला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमध्ये मिळून एकूण केवळ नऊ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यातील तीन टीएमसी पाणी उन्हाळी आवर्तनासाठी सोडण्यात येणार आहे. पुण्याला प्रतिमहा १.२५ टीएमसी पाणी लागते. गेल्या वर्षीपेक्षा यंदा धरणांमध्ये पाच टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत शहरासाठी पुरेसा पाणीसाठा नसल्याचे जलसंपदा विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे धरणांमध्ये ९० टक्के एवढाच पाणीसाठा यंदा झाला आहे. सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. १६ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत खडकवासला धरणातून तब्बल १९.१२ टीएमसी पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात आले. पुण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता सुमारे दीड ते पावणेदोन वर्षे पुरणाऱ्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर, यंदा पाऊस सुरू झाल्यापासून पहिल्या तीनचार महिन्यांत धरणांमधून तब्बल तीन टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या २६ टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. शहराच्या पाण्याबरोबरच उन्हाळी आवर्तनासाठी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर जून २०१९ पर्यंत म्हणजेच पावसाळ्यापूर्वीच धरणांमधील पाणी संपणार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार पुणेकरांसमोरील पाणी संकटाचे चित्रही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवायचे असल्यास पुणे महापालिकेच्या पाण्यात कपात करावी लागणार आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये सध्या नऊ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यातील तीन किंवा साडेतीन टीएमसी पाणी सिंचन आवर्तनासाठी जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागाला सोडण्यात येणार आहे. महापालिकेला प्रतिमहिना १.२५ टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यानुसार एप्रिलचे १५ दिवस, संपूर्ण मे महिना आणि १५ जूनपर्यंत महापालिकेला अडीच ते पावणेतीन टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यामुळे नऊ टीएमसी पाण्यापैकी केवळ अडीच टीएमसी पाणी शिल्लक राहील. धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन आणि दुष्काळामुळे काही पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच पाणीगळती, पाणीचोरी या बाबी लक्षात घेता शहराला पावसाळ्यापर्यंत पाणी कमी पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 12:46 am

Web Title: water scarcity in pune 29
Next Stories
1 पथनाटय़ कलाकारांची दररोज हजार रुपयांची बेगमी
2 शहरात चौदा हजार बालकांचे वास्तव्य रस्त्यावर
3 स्प्रिंग फिल्ड सोसायटी
Just Now!
X