|| अविनाश कवठेकर

दुरुस्तीचे काम रखडल्याचा फटका बसण्याची शक्यता; पानशेत, वरसगांव धरणांवरच पुणेकरांची भिस्त

टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम रखडल्यामुळे यंदाही टेमघर धरण रिकामे करावे लागणार आहे. टेमघर धरणात पावसाळ्यात साठणारे पाणी टप्प्याटप्प्याने खडकवासला साखळी प्रकल्पातील अन्य धरणांमध्ये वर्ग करण्यात येणार असून त्यामुळे पानशेत आणि वरसगांव या दोन धरणांवरच पुणेकरांना अवलंबून राहावे लागणार आहे.

खडकवासला साखळी प्रकल्पातील टेमघर धरणातून मोठय़ा प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याची बाब उघड झाली होती. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात होते. त्यामुळे टेमघर धरणाच्या दुरुस्तीचा निर्णय राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने घेतला. त्यानुसार गेल्यावर्षीपासून टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. गेला पावसाळा संपल्यानंतर दुरुस्तीची कामे सुरु करण्यात आल्यानंतर टेमघरमधील पाणी साखळी प्रकल्पातील वरसगांव आणि पानशेत धरणामध्ये वर्ग करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार धरण पूर्ण रिकामे करून दुरुस्तीची कामे सुरु करण्यात आली. अद्यापही दुरुस्तीची ही कामे पूर्ण झालेली नाहीत. धरणाच्या ग्राऊटिंगचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले होते. हे काम ऐंशी टक्के पूर्ण झाल्याचा दावा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यातील दुरुस्तीचे काम अद्यापही रखडले आहे. शॉर्टग्रिटिंगचे काम यंदा होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात धरणात पाणी साठविण्यात येईल. मात्र काम सुरु झाल्यानंतर धरण पुन्हा रिकामे करावे लागणार आहे. त्यामुळे पुन्हा वरसगांव आणि पानशेत धरणावरच पाण्यासाठी अवलंबून रहावे लागणार आहे.

दरम्यान, टेमघर धरण रिकामे करण्यात येणार असले तरी पुणेकरांच्या पाणीसाठय़ावर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणांची रचना एका पाठोपाठ एक अशी आहे. त्यामुळे टेमघर धरण रिकामे करताना धरणातील पाणीसाठा कोणत्या धरणात वर्ग करायचा, याचे पर्याय जलसंपदा विभागाकडे आहेत. यापूर्वीही धरणाची दुरुस्ती करताना टेमघर मधील पाणी अन्य धरणात वर्ग करण्यात आले होते, अशी माहिती जलसंपदा विभागाचे पुणे विभाग मुख्य अभियंता ता. ना. मुंडे यांनी दिली.