उपलब्ध ४.३० टीएमसीपैकी पुण्याला पिण्यासाठी निम्मे पाणी

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पांतील पाणीसाठा झपाटय़ाने कमी होत असून चारही धरणांत मिळून सध्या केवळ ४.३० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याचे नियोजन लक्षात घेता त्यापैकी केवळ निम्माच पाणीसाठा शहराला पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध होणार आहे. पुण्याला पिण्यासाठी महिन्याला सव्वा टीएमसी पाणी लागते. त्यानुसार हे पाणी पंधरा जुलैपर्यंत पुरेल, असा दावा करण्यात येत आहे. सध्या शेतीचे आवर्तन बंद असले, तरी वाढलेल्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे मोठय़ा प्रमाणावर बाष्पीभवन होत असल्याचेही वास्तव आहे.

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणातील पाणीसाठा यंदा गतवर्षीपेक्षा कमी आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शहरावर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. कालवा सल्लागार समिती आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानेही (महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी – एमडब्लूआरआरए) शहराच्या पाणीसाठय़ात कपात करण्याचे आदेश दिले आहेत. धरणातील पाणीसाठा कमी असल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानेही एक दिवसाआड पाणीपुरवठय़ाचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र पालकमंत्री गिरीश बापट यांनी धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पुरेल, असा दावा करत आवश्यकता भासल्यास धरणातील मृत पाणीसाठा (डेड स्टॉक) वापरण्यात येईल, असेही जाहीर केले आहे. त्यामुळे तूर्त शहरात पाणीकपात करण्यात आलेली नाही.

शेतीसाठी सोडण्यात येणारे आवर्तन बंद करण्यात आले आहे. त्यानंतरही जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचे जलसंपदा विभागापुढे आव्हान आहे. टेमघर धरण दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात आले आहे, तर वरसगाव धरणात १.४१ टीएमसी, पानशेतमध्ये २.३७ टीएमसी आणि खडकवासलामध्ये ०.५९ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.

पाण्याची काटकसर आवश्यकच

सध्या चारही धरणात मिळून ४.३० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. त्यापैकी शहराला निम्मे पाणी मिळण्याची शक्यता आहे. शहराला प्रतिदिन पाणीपुरवठा करण्यासाठी प्रतिदिन १२५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. त्यानुसार दरमहा सव्वा टीएमसी पाणी आवश्यक आहे. याचबरोबर समाविष्ट गावांबरोबरच आसपासच्या पाच किलोमीटर अंतरातील गावांना नियमानुसार महापालिकेला पाणीपुरवठा करावा लागतो. तसेच आषाढी वारी, दुष्काळामुळे काही पाणी राखीव ठेवावे लागणार आहे. या परिस्थितीत पावसाचे उशिरा आगमन झाल्यास जुलै महिन्यात पाण्याची परिस्थिती बिकट होणार आहे. त्यामुळे धरणातील पाण्याबाबत काटकसर आवश्यक असल्याचे सध्याचे चित्र आहे.