संभाव्य पावसाच्या भरवशावर पालिकेत सत्ताधाऱ्यांकडून पाण्याची उधळपट्टी

शहराचा पाणीपुरवठा सध्या केवळ पानशेत या एकमेव धरणावर अवलंबून असताना आणि या धरणातील पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात केली असतानाही पाणीपुरवठय़ाच्या संभाव्य धोक्याची जाणीव महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाला झालेली नाही. राज्याच्या पाटबंधारे आणि जलसंपदा विभागाने वारंवार पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिल्यानंतरही पाऊस पडेल, या अपेक्षेवर पाणी नियोजनाच्या दृष्टीने अद्याप कोणतीही कार्यवाही महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. पाऊस आणखी लांबला तर पाण्याचे काय करायचे, हा प्रश्न निर्माण झाला असून सत्ताधाऱ्यांच्या गाफीलपणाचा फटका पस्तीस लाख पुणेकरांना बसण्याची शक्यता आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांत मिळून सद्य:स्थितीमध्ये ३.५ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. यातील सर्वाधिक क्षमता असलेले वरसगाव धरण दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात आले आहे. तर टेमघर धरणातील पाणीसाठाही शून्य आहे. या परिस्थितीत सध्या केवळ खडकवासला आणि पानशेत या दोन धरणांवरच पुणे शहराची भिस्त आहे. धरणातील पाणीसाठा एप्रिल महिन्यापासून झपाटय़ाने कमी होण्यास सुरुवात झाल्यानंतर पंधरा जुलैपर्यंतच्या पाण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले. या दरम्यान हवामान विभागाने मान्सून वेळेत आणि जोरदार बरसेल, अशी शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे जोरदार पाऊस येईल आणि धरणे भरतील, या अपेक्षेवर पाण्याचे नियोजन करण्यात आले नाही. मात्र आता पानशेत धरणातील पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाऊस लांबला तर पुणेकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार असल्याचेही स्पष्ट आहे. या परिस्थितीमध्ये पाणीकपातीचा निर्णय तत्काळ घेणे योग्य ठरणार आहे. पण धरणात पाणी नसतानाही दोनवेळा पाणी देऊन पाण्याचा नाहक अपव्यय केला जात आहे.

राज्याच्या पाटबंधारे आणि जलसंपदा विभागाने महापालिकेला पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला वेळोवेळी दिला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या या सल्ल्याकडे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. महापालिका जास्तीचे पाणी वापरत नाही, असा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे. शहराची लोकसंख्या लक्षात घेता प्रती महिना एक टीएमसीहून अधिक पाणी लागते. सध्या जेमतेम ३.५ टीएमसी एवढा साठा खडकवासला आणि पानशेत या दोन धरणांत मिळून आहे. हा पाणीसाठा झपाटय़ाने कमी होत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे. या परिस्थितीमध्ये पाणी कपातीचा निर्णय का घेण्यात येत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

भीतीपोटीच निर्णय नाही

महापालिका जास्तीचे पाणी वापरते हे महापालिकेतील अधिकारी खासगीत मान्य करतात. कागदोपत्रीही ते स्पष्ट झाले आहे. मात्र पाण्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने राजकारण होत आहे. या परिस्थितीमध्ये पाणीकपातीचा निर्णय घेतल्यास भाजपवर विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता असल्यामुळेच पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून पाणीकपातीचा निर्णय घेतला जात नसल्याची चर्चा आहे.

पुणेकरांचे आरोग्य धोक्यात

धरणातील पाणीसाठय़ाने तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता गढूळ पाणीपुरवठा होण्यास सुरुवात झाली आहे. गाळ, मातीयुक्त पाणी जलकेंद्रात येत आहे. त्यातून पुणेकरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.