उद्यापासून अंमलबजावणी; विस्कळीत पाणीपुरवठा, अपुऱ्या दाबाच्या तक्रारीनंतर निर्णय

पिंपरी-चिंचवडला आठवडय़ातून एक दिवस विभागनिहाय पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून (१९ ऑगस्ट) होईल. सततचा विस्कळीत पाणीपुरवठा आणि अपुऱ्या दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठय़ाच्या ठिकठिकाणच्या तक्रारी यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. आठवडय़ात कोणत्या दिवशी कोणत्या भागातील पाणी बंद राहील, याचे वेळापत्रक पालिकेने जाहीर केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात ८३ दिवस लागू करण्यात आलेली पाणीकपात ७ ऑगस्ट २०१९ पासून मागे घेण्यात आली. त्यानंतरही पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी शहरातून होत आहेत. काही भागात पाणीच येत नाही, अशी परिस्थिती दिसून येते. गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत पाणीपुरवठा होतो आहे. यावरून पाणीपुरवठा विभाग सातत्याने लक्ष्य बनला आहे.

या पाश्र्वभूमीवर, आठवडय़ातून एक दिवस विभागनिहाय पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख मकरंद निकम यांनी याबाबतची माहिती शनिवारी दुपारी जाहीर केली. त्यानुसार प्रत्येक मुख्य नलिकेवरील एक-एक भागाचा पाणीपुरवठा आठवडय़ातून एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. असे केल्यास बंद ठेवण्यात आलेल्या भागाचे पाणी इतर भागात वितरित करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे तेथील पाणीपुरवठा सुरळीत होईल आणि पुरेशा दाबाने पाणी मिळेल, असे निकम यांनी सांगितले. नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा साठा करू नये. पाण्याचा जपून वापर करावा. पाण्याची गळती आढळून आल्यास पालिकेच्या हेल्पलाईनवर (८८८८००६६६६) कळवावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

वार आणि पाणीपुरवठा बंद राहणारे प्रमुख परिसर

  • सोमवार : निगडी गावठाण, प्राधिकरण (सेक्टर २७, २७ (अ), २८), कुदळवाडी-देहू-आळंदी रस्ता (उजवी बाजू), भोसरीचा काही भाग, किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी, पुनावळे, थेरगाव, चिंचवडगाव, नाशिकफाटा, मनपाशाळा, कुंदननगर.
  • मंगळवार : प्राधिकरण (सेक्टर २४, २५), ओटा (आकुर्डी), कुदळवाडी ते देहू-आळंदी रस्ता (डावी बाजू), डीवाय पाटील महाविद्यालय रस्ता (रावेत), ताथवडे, काळेवाडीचा काही भाग, पिंपरी बाजारपेठ, पिंपरीनगर, पिंपरीगाव, गांधीनगर, खराळवाडी, मोशी गावठाण, देहू रस्ता (दोन्ही बाजू), गणेश साम्राज्य, पांजरपोळ, धावडेवस्ती, लांडगेनगर, दिघी रोड, नेहरूनगर स्टेडियम, विठ्ठलनगर, अजमेरा, वास्तुउद्योग, म्हाडा.
  • बुधवार : आकुर्डी गावठाण, प्राधिकरण (से. २३, २६ ,२८), नागेश्वर शाळा, चिखली गावठाण, किवळेचा काही भाग, मामुर्डी, सयाजी हॉटेल, वाकडचा काही भाग, पिंपळे सौदागरचा काही भाग, पिंपळे गुरवचा काही भाग, मोशी कचरा डेपोचा भाग, कासारवाडी रेल्वे गेटखालील परिसर, दिघी गावठाण.
  • गुरुवार : मोहननगर, इंदिरानगर, एम्पायर, काळभोरनगर, दत्तवाडी, त्रिवेणीनगरचा काही भाग, तळवडे गावठाण, चिखलीचा काही भाग, रहाटणीचा काही भाग, पिंपळे गुरवचा काही भाग, फुलेनगर, तापकीरनगर, भोसरीचा काही भाग, लांडेवाडी.
  • शुक्रवार : चिंचवड रेल्वे स्टेशन, संभाजीनगर, शाहूनगर, यमुनानगर, रूपीनगर, जगताप डेअरी, पिंपळे निलखचा काही भाग, दत्तनगर, काळा खडक, सांगवी, संततुकारामनगरचा काही भाग, शंकरवाडी, नाशिकफाटा, चऱ्होलीचा काही भाग.
  • शनिवार : कृष्णानगर, पूर्णानगर, शरदनगर, घरकुल, अजंठानगर, ताथवडेचा काही भाग, वाकडचा काही भाग, बिजलीनगर, चिंचवडेनगर, जुने वल्लभनगर, कासारवाडी, फुगेवाडी, बोऱ्हाडेवाडीचा काही भाग.
  • रविवार : जाधववाडी, चिखली-मोशी शिवरस्ता, शाहूनगर-आनंदनगर, विकासनगर, एमबी कॅम्प, वाकडचा काही भाग, प्रेमलोक पार्क, उद्योगनगर, गिरीराज, रस्टन, वेताळवगर, दापोडी, बोपखेल, उद्यमनगर, दिघीचा काही भाग.