पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या क्षेत्रात संततधार पाऊस सुरू राहिल्यामुळे मंगळवारी सकाळी खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.
जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवडय़ाच्या शेवटी धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठय़ात वाढ झाली असून खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव या धरणांमध्ये मंगळवार सकाळपर्यंत ११.५८ टीएमसी (अब्ज घन फूट) इतका उपयुक्त पाणीसाठा जमा झाला होता. खडकवासला धरण सोमवारीच ८४ टक्के भरले होते, तर मंगळवारी सकाळपर्यंत या धरणात १.८१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा जमा झाला होता. सकाळी नऊ वाजता या धरणातून दोन हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला. धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे दुपारी तीन वाजता ४,२६० क्यूसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मुठा नदीत १५ हजार क्यूसेक्सने पाणी सोडल्यास बाबा भिडे पुलावर पाणी येते. त्यामुळे आपत्ती नियंत्रण कक्षाने उपायुक्त व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.