जिल्ह्य़ातील बारामती, आंबेगाव, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, पुरंदर आणि शिरूर अशा आठ तालुक्यांमध्ये ऐन पावसाळ्यात तब्बल २२१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्य़ाच्या काही भागांत अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने गंभीर पाणीटंचाई कायम असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्य़ातील बारामती, आंबेगाव, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, पुरंदर आणि शिरूर अशा आठ तालुक्यांमध्ये एक हजार १९६ वाडय़ा आणि १३० गावांमधील तीन लाख ९५ हजार ५४९ नागरिक बाधित आहेत. तसेच १६ हजार ४४५ पशुधन बाधित आहे. या तालुक्यांमध्ये २२१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे सर्व टँकर खासगी असून या भागात एकाही शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याचे विभागीय आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. इंदापूर तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. त्याखालोखाल बारामती, दौंड  आणि पुरंदर, शिरूर तालुक्यांत टँकर सुरू आहेत. या ठिकाणी ७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांची दुष्काळ नियंत्रण समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा ०२०-२६१२२११४ हा दूरध्वनी क्रमांक असून त्यावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच टँकरची मागणी झाल्यानंतर चोवीस तासांमध्ये संबंधित ठिकाणी टँकर सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

इंदापूरमध्ये ६९ टँकर

इंदापूरमध्ये ६९, बारामतीमध्ये ४८, दौंड आणि पुरंदरमध्ये प्रत्येकी ३२, शिरूरमध्ये २७, आंबेगावमध्ये पाच, तर जुन्नर आणि हवेलीमध्ये प्रत्येकी चार असे एकूण २२१ टँकर जिल्ह्य़ातील आठ तालुक्यांमध्ये  सुरू आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आली.