08 March 2021

News Flash

पेट टॉक : श्वानुल्याच्या वाढदिवसाला यायचं हं!

हळूहळू ती विस्तारत वाढदिवसाच्या पार्टीची तयारी करणे ही संकल्पना तयारी झाली.

कुत्र्या-मांजरांचेही वाढदिवस निगुतीने साजरे करण्याची टूम सध्या प्राणिपालकांमध्ये लोकप्रिय होत चालली आहे.

गेल्या दशकभरात घरातील कच्च्याबच्च्यांचा वाढदिवस साजरा करण्याची जबाबदारी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपन्यांनी उचलली. शहरी-निमशहरी भागांत हा ट्रेंड मोठय़ा प्रमाणावर अगदी सहजी फोफावला. लहान मुलांना वाढदिवसाला खूश करण्यासाठी आर्थिक स्तरानुसार जसे खास गेमथिम्स आखण्यात येतात, तसेच घरात बाळगल्या गेलेल्या कुत्र्या-मांजरांचेही वाढदिवस निगुतीने साजरे करण्याची टूम सध्या प्राणिपालकांमध्ये लोकप्रिय होत चालली आहे.

आजच्या बच्चे मंडळींना घरात वाढदिवस साजरा करण्यापेक्षा ऐसपैस हॉलमध्ये मित्रमंडळींना बोलावून वाढदिवसाचा सोहळा करण्यात रस असतो. बडबडीपासून विविध खेळांची रचना करणारे जोकर, समारंभ झोकात होण्यासाठी राबणारी यंत्रणा मुलांना सेलिब्रेटी असल्याची जाणीव करून देत हा कार्यक्रम आखतात. सध्या अनेक घरांमध्ये मुलांची जागा ‘पेट’ ने घेतली. घरातील सदस्याप्रमाणेच पाळलेल्या प्राण्यांना महत्त्व प्राप्त झाले. त्यानंतर या प्राण्यांसाठीही काहीतरी ‘स्पेशल’ करण्याचा सोस वाढू लागला. तेव्हा या मागणीसाठी पुरवठा करण्यातून पेटपार्टीची संकल्पना आपल्याकडे रूजत आहे. आपल्या आनंदाप्रमाणेच प्राण्याच्या आनंदाची व्याख्या करत घरोघरी ‘पेट पार्टी’ किंवा पेट बर्थडे पार्टीचे आयोजन होऊ लागले.

अमेरिकेतील ‘हॉलीवूड पेट पार्टीज’ ही संस्था या नव्या प्रकाराची जननी म्हणता येईल. प्राण्यांसाठी बेकरी उत्पादने तयार करणे ही या संस्थेची मूळ कल्पना होती.

हळूहळू ती विस्तारत वाढदिवसाच्या पार्टीची तयारी करणे ही संकल्पना तयारी झाली. वाढदिवसाबरोबरच ‘पेट हॉलिडे पार्टी’, ‘पेट पूल पार्टी’ असे वेगवेगळे प्रकार या कंपनीने सुरू केले. त्यानंतर आता जगाच्या पाठीवर अगणित कंपन्या या उद्योगात स्थिरावल्या आहेत. वेगवेगळ्या संकल्पना घेऊन पार्टीचे आयोजन केले जाते. काटरून्स, परीकथांमधील व्यक्तिरेखा, चित्रपटांमधील व्यक्तिरेखा अशा कल्पना पार्टीसाठी राबवल्या जातात. त्यासाठी प्राण्याच्या कपडय़ांपासून ते केक, रिटर्न गिफ्ट्स, प्राणी आणि मालकांसाठी वेगवेगळे खेळ आयोजित करणे असा सगळा जामानिमा या कंपन्या करतात.

पुणे, मुंबई सरावले

पुणे आणि मुंबईत पाळीव प्राण्यांचा वाढदिवस करणे, त्यासाठी जंगी पार्टीचे आयोजन करणे या संकल्पना आता रुळल्या आहेत. पुण्यात साधारण दहा ते बारा कंपन्या पाळीव प्राण्यांच्या वाढदिवसाच्या नियोजनाची सेवा पुरवतात. भारतात ही संकल्पना रूजवण्यात ‘पेट रिसॉर्ट’आणि क्लबचा मोठा वाटा आहे. क्लबच्या सदस्यांसाठी वाढदिवसाची पार्टी आयोजित केली जाते.

मोठा हॉल घेऊन किंवा घरी वाढदिवस करण्याइतपत अजून समाजमन सरसावलेले नाही. अद्यापही या प्रकाराकडे चोचले म्हणून पाहणाऱ्यांची किंवा खिल्ली उडवणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र या पलीकडे जाऊन ही बाजारपेठ तेजीत आहे. पेट रिसॉर्टवर जाऊन वाढदिवस साजरा करण्याकडे प्राणी पालकांचा अधिक कल आहे. ही रिसॉर्ट नियोजनाची सर्व जबाबदारी उचलतात.

केक, डोनट्स, कुकीज

वाढदिवसाला केक हवाच हे मानवी समीकरण आता साहजिकच पालकांकडून प्राण्यांनाही लागू करण्यात आले आहे. प्राण्यांसाठी वाढदिवसाचे केक, डोनट्स तयार करणाऱ्या बेकऱ्यांची साखळी देशभरात उभी राहिली आहे. ‘डॉगीज डब्बा’ सारख्या कुत्र्यांसाठी घरचा डबा पुरवणाऱ्या कंपन्या वाढदिवसाचे केकही तयार करून देतात. आकर्षक दिसणारे, वेगवेगळ्या आकारातील हे केक खास कुत्री किंवा मांजरांसाठी तयार केलेले असतात. याशिवाय मुंबई आणि पुण्यात केक किंवा बेकरी उत्पादने पुरवणारे अनेक खासगी व्यावसायिक मागणीनुसार प्राण्यांसाठीही ही उत्पादने तयार करून देत आहेत. पुण्यातील ‘वन्स अपॉन बेकरी’, ‘व्हिस्कर्स – द बेकर्स’, चेंबूर येथील ‘गॉरमेट बेकरी’ अशी अनेक उदाहरणे देता येतील. याबाबत ‘वन्स अपॉन अ बेकरी’च्या मोहना अहलुवालिया यांनी सांगितले, ‘आपण खातो ते सगळेच प्राण्यांना चालत नाही. माझ्याकडे कुत्रे आहे. त्याच्यासाठी मी सुरूवातीला केक तयार केला. त्यानंतर आता मागणीनुसार प्राण्यांसाठी केक तयार करून देते. पालकांनी निवडलेले आकार, घटक यानुसार केक तयार करण्यात येतात. त्यासाठी आता मागणी वाढते आहे. आपण खातो त्या केकच्या ज्याप्रमाणे किमती असतात त्याचप्रमाणे प्राण्यांसाठी तयार केलेल्या केकच्या किमती असतात. साधारण ५०० रुपयांमध्ये अध्र्याकिलोपर्यंतचा केक मिळू शकतो.

वाढदिवस करायचा, पण कितवा?

माणसाच्या प्रत्येक वयाच्या टप्प्याचे काही वैशिष्टय़ असते. त्यानुसार वाढदिवस केले जातात. त्याचप्रमाणे प्राण्यांचे वाढदिवस करण्याचाही ट्रेंड आहे. प्राण्यांचे आयुष्य हे साधारण १५ ते २० वर्षांचे असे असतानाही त्यांचे आयुष्य माणसाच्या आयुष्यमानाशी तुलना करून ठरवले जाते आणि त्यानुसार त्यांचे वाढदिवस केले जातात. त्यामुळे कुत्र्याचा २१ वा वाढदिवसही साजरा होतो. ‘डॉग एज’ किंवा ‘कॅट एज’ सांगणारी अनेक संकेतस्थळे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 1:43 am

Web Title: way to celebrate pet dogs birthday
Next Stories
1 मुंढेंचा आणखी एक दणका; कामकाजात त्रुटी आढळल्याने आगार व्यवस्थापकाला नोटीस
2 लोणावळ्यात महाविद्यालयीन तरूण-तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
3 काम करताना सेल्फ मोटिवेशन महत्वाचे- तुकाराम मुंढे
Just Now!
X