20 November 2019

News Flash

भाजे धबधब्याकडे जाणारा मार्ग शनिवार, रविवार बंद

वर्षांविहारामुळे पर्यटनस्थळांवर कोंडी

(संग्रहित छायाचित्र)

कार्ला लेणी, भाजे लेणी धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी चारनंतर या भागातील रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत.

वर्षां विहारासाठी लोणावळा परिसरातील भाजे लेणी धबधबा, कार्ला लेणी धबधबा, लोहगड आणि विसापूर किल्ला परिसरात पर्यटकांची गर्दी होऊ लागली असून शनिवारी आणि रविवारी या परिसरात मोठी गर्दी होते. पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर मोठय़ा प्रमाणावर चारचाकी वाहने आल्याने या भागात कोंडी होते. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करणे अवघड होत आहे.

या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळांकडे जाणारे मार्ग शनिवारी आणि रविवारी सायंकाळी चारनंतर बंद ठेवण्यात येणार आहेत. पर्यटनस्थळांकडे जाणारी वाहने कार्ला फाटा येथे थांबविण्यात येणार आहेत. भाजे धबधबा भागात सायंकाळी साडेपाचनंतर पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार नाही.

लोणावळा ग्रामीण परिसरातील लेणी तसेच किल्ल्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांना सायंकाळनंतर प्रवेश देण्यात येणार नाही. पर्यटनस्थळी जाणारे मार्ग बंद ठेवण्यात येतील. भाजे लेणी आणि लोहगड किल्ल्याकडे जाणारा मार्ग अरुंद आहे तसेच या मार्गावर खड्डे आहेत. गेल्या आठवडय़ात या भागात मोठी कोंडी  झाली होती. त्यामुळे पर्यटकांना कोंडीत अडकून पडावे लागले होते.

कोंडी सोडविण्यासाठी स्थानिक स्वयंसेवकांची मदत

पर्यटनस्थळांवर शनिवारी तसेच रविवारी होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून पर्यटनस्थळी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या भागातील कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून स्थानिक स्वयंसेवकाची मदत घेण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशारा लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी दिला आहे.

First Published on July 13, 2019 1:24 am

Web Title: way to the bhaje waterfall closed saturday sunday abn 97
Just Now!
X