चीन आणि जपान या दोन देशांनी रेल्वे क्षेत्रात गुंतवणूकीला फार पूर्वीपासूनच सुरूवात केली असून त्यांच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी भरघोस तरतूद करण्यात येते. या तुलनेत आपण मागे आहोत, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी सांगितले आहे. पुण्यात ते एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

सुरेश प्रभू म्हणाले, देशात रेल्वेचा विकास होण्यासाठी ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे, त्या उभारण्यासाठी आता आपल्याकडे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे रेल्वेकरिता विशेष आर्थिक तरतूद देखील केल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रयत्नांमुळे येत्या काही काळात रेल्वेचा कायापालट झालेला दिसेल, असा विश्वास प्रभु यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच रेल्वेचा अर्थसंकल्प येत्या काही वर्षात २ लाख ७५ हजार कोटी रुपयांपर्यत वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर देशात ४० हजार रेल्वे डब्यांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. मीटरगेज रेल्वमार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर सुरू असून कालांतराने त्यांचे विद्युतीकरण करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर देशातील ४० ते ५० रेल्वेस्थानकांवर विमानतळासारख्या सुविधा देण्यावर भर दिला जाणार आहे. देशातील प्रवाशाची संख्या लक्षात घेता, मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते कोलकाता या रेल्वेमार्गांवर येत्या काही दिवसांत २०० किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवासी रेल्वे चालविण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.