अवघ्या महाराष्ट्राचे आकर्षण ठरणाऱ्या पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता वैभवशाली आणि दिमाखदार मिरवणुकांनी गुरुवारी दुपारी एक वाजून ५५ मिनिटांनी झाली. मुख्य विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ बुधवारी सकाळी साडेदहा वाजता झाला. विसर्जन मिरवणूक २७ तास २५ मिनिटे चालली होती. मिरवणुकीत यंदा मुसळधार पाऊस झाल्यामुळे मिरवणुकीपेक्षाही यंदा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला, तो पाऊस. ‘मिरवणुकीच्या दिवशी असा पाऊस कधीच बघितला नव्हता,’ अशीच प्रतिक्रिया सर्वत्र ऐकायला मिळत होती.
पुण्यनगरीतील गणेशोत्सव जेवढा वैशिष्टय़पूर्ण, तेवढय़ाच विसर्जन मिरवणुकाही वैशिष्टय़पूर्ण असतात. यंदाही ही वैशिष्टय़ं जोपासत मिरवणूक शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडली. महात्मा फुले मंडईसमोरील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून बुधवारी सकाळी साडेदहा वाजता मुख्य मिरवणुकीला प्रारंभ झाला आणि पारंपरिक पद्धतीने मानाचे पाच गणपती एकापाठोपाठ लक्ष्मी रस्त्यावर येत गेले. मात्र, दुपारपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली होती. दरवर्षी मिरवणुकीत पावसाच्या काही सरी पडतात आणि या सरींचा शिडकावा कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच वाढवतो. यंदा मात्र पावसाने कहर केला. मिरवणुकीच्या दरम्यान बुधवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास सुरू झालेला पाऊस गुरुवारी सकाळपर्यंत अखंडपणे पडत होता. विसर्जनाच्या दिवशी पाऊस हमखास पडतो; पण एवढा पाऊस कधीच बघितला नव्हता, अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते, मंडळांचे पदाधिकारी, पथकांमधील वादक, मंडळांशी संबंधित जुनी मंडळी, पोलीस आणि नागरिकांकडून ऐकायला मिळाली.
सतत पडणाऱ्या पावसाने मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना आणि रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो पुणेकरांना चिंब भिजवले. मुसळधार पावसामुळे ढोल-ताशा, बँड पथकांच्या वादनावरही खूपच मर्यादा आल्या होत्या. सतत पडत राहिलेल्या पावसाने ढोल-ताशांची पाने चिंब भिजत होती. त्यामुळे त्यातून हवा तसा आवाजही निघत नव्हता. मानाच्या पाच गणपतींचा विसर्जन सोहळा सायंकाळी पावणेसात वाजता संपला. अखिल मंडई मंडळाचा ‘तिरुपती’ रथ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा ‘शेषात्मज गणेश’ रथ प्रेक्षणीय झाले होते आणि ही दोन्ही मंडळे यंदा तीन तास अगोदरच टिळक चौकात आली.
दहशतवादी कृत्य आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमुळे निर्माण झालेला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न यांच्या सावटाखाली ही मिरवणूक होती.  एकूण परिस्थिती लक्षात घेऊन बंदोबस्तासाठी साडेसात हजार पोलिस नेमण्यात आले होते. तसेच पोलिसांच्या मदतीला हजारो स्वयंसेवक आणि दीडहजार सीसीटीव्ही देखील होते. मात्र, यंदा पावसामुळे गर्दी खूपच कमी होती. त्यामुळे ढकलाढकली, रेटारेटी, लाठीमार, मंडळांमधील वादावादी आदी प्रकार अपवादानेच पाहायला मिळाले. पावसामुळे यंदा पोलिसांना थोडा दिलासा मिळाला, तर वस्तू, खेळणी, खाद्यपदार्थ आदींच्या विक्रेत्यांना मात्र चांगलाच फटका बसला.
मिरवणुकीला लागलेला वेळ
सन २०११: २७ तास २० मिनिटे
सन २०१२: २८ तास ५० मिनिटे
सन २०१३: २७ तास २५ मिनिटे