स्वार्थ ठेवून आम्ही राजकारणात काम करत नाही. निवडणुका आल्या की पवार साहेब आणि मी विरोधकांचे लक्ष्य ठरतो. काहीही पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप करून आम्हाला बदनाम करण्याचे षड्यंत्र विरोधक रचतात. त्यांना विकास करणे कधी जमले नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पिंपरीत केली.
पिंपरी पालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त रामकृष्ण मोरे नाटय़गृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर मोहिनी लांडे होत्या. आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, उपमहापौर राजू मिसाळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, पक्षनेता मंगला कदम आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, १९९५ च्या निवडणुकीत पवार साहेब व दाऊदचे संबंध असल्याचा आरोप करून रान उठवण्यात आले. त्यात काहीही तथ्य नसल्याचे नंतर उघड झाले. आपल्यावर भ्रष्टाचाराचे सातत्याने आरोप केले जातात. मात्र, त्याचे पुरावे दिले जात नाहीत. चिंचवडला मुख्यमंत्री आला की त्याचे पद जाते, कराडला एका कारखान्यात मुख्यमंत्री गेल्यास पद जाते, अशा खुळ्या कल्पना मांडल्या जातात. मात्र, त्या अंधश्रध्दा आहेत. मंदीमुळे अमेरिकेत बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला, त्याचा फटका पिंपरीतील लघुउद्योजकांना बसला आहे. गाडय़ांचे उत्पादनही थांबले आहे. उद्योगांना शेतकऱ्यांप्रमाणे विजेत सबसिडी देण्याचा शासनाचा विचार सुरू आहे. आतापर्यंतच्या प्रवासात पिंपरीची चांगली प्रगती झाली, पुढील २५ वर्षांचे नियोजन ठेवून आदर्श शहरासाठी आवश्यक आराखडा तयार करू. मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रामुळे शहराच्या लौकिकात भर पडणार आहे. कोणत्याही परिस्थितीत गहुंज्याचा समावेश पिंपरीत होणारच आहे.
पालिकेच्या ‘सारथी’ हेल्पलाईनमुळे आमची किंमत कमी झाल्याची भावना नगरसेवकांमध्ये असली तरी अजितदादांनी मात्र त्याचे भरभरून कौतुक केले. सारथीमुळे दैनंदिन प्रश्नांची सोडवणूक होत असून वर्षांअखेरीपर्यंत हिंदूी व इंग्रजीमध्ये ही हेल्पलाईन उपलब्ध करणार आहे, असे ते म्हणाले. बूटवाटपातील घोळ व त्यावरून झालेल्या पेपरबाजीवरून त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. पाच वाजताची वेळ असताना चार वाजताच अजितदादा आले व कार्यक्रम सुरू करण्याची सूचना त्यांनी केल्याने सर्वाचीच तारांबळ उडाली.
अजितदादांकडून उपदेशाचे ‘डोस’
वर्धापनदिनाच्या निमित्ताने अजितदादांनी उपदेशाचे भरपूर डोस दिले. चुकीच्या कामांना पाठबळ देऊ नका, बेस्ट सिटीचे सातत्य  टिकवा, झोपडय़ा वाढू देऊ नका, पाण्याची गळती रोखा, नदी स्वच्छ ठेवा, कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावा, पोलिसांप्रमाणे हद्दीचा वाद घालू नका, नागरिकांना चांगल्या सुविधा द्या, बोनस घेतला आता जबाबदारीने काम करा, शहर विद्रूप करणाऱ्यांच्या विरोधात खटले दाखल करा, राष्ट्रवादीवाले असले तरी त्यांनाही सोडू नका, वैयक्तिक स्वार्थासाठी काम करू नका, असे आवाहन त्यांनी केले.