“वीर सावरकर यांना सरकार भारतरत्न देत नसेल तरीही आपण त्यांना भारतरत्नच म्हटलं पाहिजे. यापुढे वीर सावरकर यांचा उल्लेख करताना आपण त्यांना भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर असंच म्हटलं पाहिजे” असं  अभिनेते शरद पोंक्षेंनी म्हटलं आहे. स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि हिंदू हेल्पलाईन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मी सावरकर वक्तृत्व’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात पोंक्षे बोलत होते.

शरद पोंक्षे म्हणाले की, “हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्रच आहे. आम्हाला हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे हे कुणीही सांगण्याची गरज नाही. या हिंदुस्थानने सगळ्यांशी बंधुत्वाचं नातं जोडलं आहे. वीर सावरकरांनी जात कधीच मानली नाही. परिणामी वीर सावरकरांना सनातन हिंदू धर्म मान्य आहे. त्यामुळे आजच्या काळात सावरकरांना समजून घेतलं पाहिजे. मात्र ज्या भूमीत सावरकर जन्माला आले, त्या भूमीतील लोकांना सावरकर आजवर समजलेच नाही” अशीही खंत शरद पोंक्षे यांनी बोलून दाखवली. ज्या वीर सावरकरांनी या देशातील जाती मोडण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले.  त्यांना कायम एका चौकटीत अडकवलं गेल्याचेही पोंक्षे यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्यावर टीका 

दिल्लीतल्या वेड्या मुलाचं बोलणं लोकांनी फार मनावर घेऊ नये. ज्या व्यक्तीला आपली आजीने म्हणजेच इंदिरा गांधी यांनी सावरकरांच्या स्मारकासाठी  वैयक्तिक देणगी दिली होती.  ही गोष्टदेखील माहिती नाही. ती व्यक्ती सावरकरांबद्दल बोलली, तर त्या दिल्लीतील मुलाकडे फारसे लक्ष देऊ नका. अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

शरद पोंक्षे म्हणाले, “आजही देशात सर्वोत्तम राज्यकर्ते म्हणून प्रभू राम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतलं जात असून शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला आहे. हे प्रकरण अभ्यासक्रमातून वगळण्यात आले आहे. कारण, की मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातील. परंतु मुस्लिम समाजाला खरा इतिहास सांगण्याची गरज आहे” असंही मत त्यांनी व्यक्त केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज आपण हिंदू म्हणून जगत असल्याचंही शरद पोंक्षेनी म्हटलं आहे.