‘पक्षाला नाव द्यायचं नाही, पण आम्हीही आम आदमीच आहोत. आम्ही राजकारणी काही प्लुटोसारख्या ग्रहावरुन पडलो नाही. आम्हीही तुमच्या सारखेच आहोत,’ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
‘स्वानंद अॅडव्हेंचर ग्रुप’च्या वतीने आणि आमदार विनायक निम्हण यांच्या संकल्पनेतून ‘दिल्ली ते पुणे सायकल फेरी’चे आयोजन करण्यात आले होते. फेरीच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमासाठी राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम आणि महापौर चंचला कोद्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पर्यावरण आणि तरुणांमध्ये सायकल चालवण्याविषयी जनजागृती आणि ‘मुलगी वाचवा’ हा संदेश पसरवण्यासाठी या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप मंगळवारी झाला. फेरीमध्ये २९ जण सहभागी झाले होते.
सुळे येरवडय़ापासून स्वत: सायकल चालवीत फेरीमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्या पाश्र्वभूमीवर अनेकांनी त्यांना, तुम्ही सायकल चालवता का, असा प्रश्न विचारला. ‘फक्त मीच नाही तर दिल्लीमध्ये अनेक खासदार सायकल चालवतात,’ असे सांगत पुण्यामध्ये जास्तीत जास्त चांगले सायकल ट्रॅक पुणे महापालिकेने बांधवेत, अशी मागणी त्यांनी महापौरांकडे केली. निम्हण यांनी १३ दिवसांच्या कालावधीत आलेले अनेक अनुभव सांगितले. पुणेकरांनी छोटय़ा अंतरावरच्या कामांसाठी सायकल वापरावी, तरच आम्हाला आमच्या या अभियानाचे सार्थक झाले असे वाटेल, असे आवाहन त्यांनी केले. भारती विद्यापीठामध्ये दुचाकी येणार नाही, अशी योजना करावी, अशी मागणी त्यांनी कदम यांच्याकडे केली. या प्रसंगी अनेक नगरसेवक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

‘कोणीही सायकल चालवू शकतो’
‘६७ वर्षांचा तरुण, १५ वर्षांचा नववीतील मुलगा आणि माझ्यासारखा १०० किलो वजन असलेला माणूस जर काश्मीर ते कन्याकुमारी सायकल चालवू शकतो तर, कोणीही सायकल चालवू शकतो,’ असे मत आमदार विनायक निम्हण यांनी व्यक्त केले.