विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील भाजपात गेल्याने आघाडीला काहीही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. तसेच हातकणंगलेची गेल्या दहा वर्षांपासून आमच्याच ताब्यात आहे. त्यामुळे आघाडीने ती जागा आम्हाला देत असल्याचं सांगू नये. वर्धा आणि बुलढाणा या ठिकाणीही स्वाभिमानीला जागा मिळावी अशीही मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. आम्ही यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन दिवसांची मुदत दिली आहे. आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही किमान १६ जागांची यादी जाहीर करू असाही पवित्रा राजू शेट्टी यांनी घेतला आहे.

बुलढाणा येथून रविकांत तुपकर, वर्ध्यातून सुबोध मोहिते हे उमेदवार असतील असंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं. तसंच माढा येथील जागा शरद पवार लढवणार होते त्यामुळे त्या जागेची मागणी आम्ही केली नव्हती. मात्र आता ते लढणार नसल्याने आम्ही त्या जागेचीही मागणी करतो आहोत असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

माढा येथे भाजपाला उमेदवार नव्हता. भाजपाचे संभाव्य उमेदवार सुभाष देशमुख यांचीही लढण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्या मतदारसंघात शरद पवारांना अडचण निर्माण करणारा नेता नव्हता. तरीही ती जागा सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे आता आम्ही त्या जागेची मागणी केली आहे असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.