ठेवीदारांचे पैसे थकवल्यामुळे अडचणीत आलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन गुंतवणूकदारांना आश्वस्त केले. मी विजय मल्ल्याप्रमाणे गुंतवणुकदारांचे पैसे घेऊन परदेशात पळून गेलेलो नाही. मात्र, मी एकाही गुंतवणूकदारांचे पैसे ठेवणार नाही. सर्वांना पैसे परत करेन, असे आश्वासन यावेळी डीएसकेंनी दिले.

गेल्या काही दिवसांत डीएसके समूहाविषयी प्रसारमाध्यमांवर आणि सोशल मीडियावर अनेक बातम्या फिरत आहेत. अशा नकारात्मक आरोपांना प्रत्युत्तर देण्याच्या फंदात मी सहसा पडत नाही. मात्र, यामुळे समूहाच्या विश्वासार्हतेवर गंभीर परिणाम व्हायला लागल्याने मी सगळ्यांना विश्वासात घेण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली. मी आजपर्यंत कुणालाही फसवलं नाही. माझा कारभार पहिल्यापासून पारदर्शक राहिलाय. गेल्या काही दिवसांत अडचणी आल्यामुळे ठेवीदारांचे पैसे द्यायला आम्हाला उशीर झालाय, ही बाब मान्य आहे. मात्र, ठेवीदारांना फसवणे आणि पैसे द्यायला उशीर होणे, या दोन भिन्न बाबी असल्याचे डीएसकेंनी सांगितले. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी भविष्यात माझ्यावर आरोप करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा, असेही त्यांनी सूचवले.

सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यामुळे घरांचे भाव निम्म्यावर आले. त्यामुळे जानेवारी २०१७ पासून व्यवसायात काही अडथळे येत होते. तत्पूर्वी जानेवारी ते ऑक्टोबर २०१६ पर्यंत आम्ही गुंतवणुकदारांचे २५० कोटी परत केले. सध्या आमच्याकडे तब्बल आठ हजार मुदत ठेवी आहेत. यापैकी ९० टक्के गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक आहेत. लवकरच सर्व व्यवस्थित होईल आणि आम्ही सर्वांचे पैसे परत देऊ, असे डीएसके यांनी सांगितले.

‘डीएसके’ समूहाकडून मुंबईत सात कोटी रुपयांची फसवणूक

गेल्याच आठवड्यात विशेष न्यायालयाने डी. एस. कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. बांधकाम क्षेत्रात बडे प्रस्थ असलेले डी. एस. कुलकर्णी हे ठेवीदारांची फसवणूक केल्याने अडचणीत आले आहेत. याप्रकरणी सुमारे ३५१ ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केले होते. १२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगितले जाते. शेवटी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दीपक सखाराम ऊर्फ डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती दीपक कुलकर्णी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला होता.