‘माळीण आणि परिसरातील गावांनी आपले मतभेद बाजूला ठेवून पुनर्वसनासाठी जागा द्यावी. राज्यात आदर्श गाव ठरेल अशा पद्धतीने या गावाचे पुनर्वसन करू,’ अशी ग्वाही महसूल, मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
खडसे यांनी आज माळीण गावाला भेट देऊन तेथील पुनर्वसनाच्या कामाबाबत आढावा बठक घेतली. या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील, विभागीय आयुक्त एस. चोक्किलगम, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी उपस्थित होते. या वेळी ग्रामस्थांना मदतनिधीही देण्यात आला.
या वेळी खडसे म्हणाले, ‘माळीणच्या पुनर्वसनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. गरज पडल्यास नियमात शिथिलता आणून मदत दिली जाईल. माळीण गावाच्या पुनर्वसनासाठी पुनर्वसन कायदा लागू करता येत नाही. मात्र, विशेष बाब म्हणून पुनर्वसन कायद्याखालील सर्व सुविधा पुरवण्यात येतील. गावातील कोणी कर्ज घेतले असेल तर ती कर्जे माफ केली जातील. पडकाई योजनाही पुन्हा सुरू करण्यात येईल.’’ माळीण गावचे पुनर्वसन झांजरेवाडी येथे करायचे की कशाळवाडी येथे करायचे याबाबत अद्याप ग्रामस्थांचे एकमत नाही. अडिवरे येथील ग्रामस्थांनीही पुनर्वसनासाठी विरोध केला आहे. त्या पाश्र्वभूमीवर पुनर्वसनाला विरोध करू नका, असे आवाहन खडसे यांनी केले.