सात ते दहा दिवस टिकणाऱ्या तापाच्या जोडीला पंधरा ते वीस दिवस कमी न होणारा अशक्तपणा आणि अचानक वर-खाली होणाऱ्या विषाणूजन्य तापाबरोबर काही रुग्णांना होणारी सांधेदुखी व डोकेदुखी यामुळे रुग्ण बेजार झाल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. विषाणूजन्य तापातही सांधेदुखी, डोकेदुखी, थंडी वाजून येणे अशी विविध लक्षणे अनेक रुग्णांत दिसत असल्यामुळे रुग्ण प्रथम डेंग्यूच्या शंकेने घाबरुन जात आहेत.
नोव्हेंबरमध्ये शहरात १५४ संशयित डेंग्यूरुग्ण आढळले असून गेल्या महिन्याच्या तुलनेत ही संख्या कमी झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. परंतु वैद्यकीय व्यावसायिकांच्या निरीक्षणानुसार डेंग्यू तापाच्या रुग्णसंख्येत म्हणावी अशी घट झाली नसून आता पुन्हा पाऊस पडून गेल्यामुळे हे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. डॉ. संताजी कदम म्हणाले,‘ढगाळ वातावरणात डेंग्यूसह सर्दी, खोकला व विषाणूजन्य ताप वाढतो. यात काही रुग्णांत प्रचंड सांधेदुखी व डोकेदुखी व  १५ ते २० दिवस न जाणारा अशक्तपणा (पोस्ट व्हायरल वीकनेस) अशी लक्षणेही दिसून येत आहेत. आधीच तापामुळे वैतागलेले रुग्ण या अशक्तपणामुळे आणखी जेरीस येत आहेत. कित्येकदा डेंग्यूच्या शंकेने घाबरुन रुग्णालयात दाखल होत आहेत. ढगाळ हवामानात खूप दिवस राहणारा व रात्री वाढणारा अॅलर्जिक खोकला व कफप्रकृती असलेल्या रुग्णांमध्ये कफ साठण्याचे प्रमाण वाढून त्रास झालेला बघायला मिळत आहे. तसेच दम्याच्या व संधीवाताच्या रुग्णांचा त्रासही वाढला आहे.
जवळपास ६५ टक्के रुग्णांना ‘बी १२’ व ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असते. प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे सांधेदुखी अधिक जाणवते व हाडांवर आजारांचा लवकर परिणाम दिसतो. तसेच अशक्तपणा अधिक जाणवतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे, असेही डॉ. कदम यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत कडक ऊन, थंडी आणि पाऊस असे तिन्ही ऋतू एकदमच बघायला मिळाले असल्यामुळे त्या तिन्हीचेही तोटे दिसत असल्याचे डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले. ते म्हणाले,‘पाऊस सुरू होण्यापूर्वी दररोज बघायला मिळणाऱ्या १० पैकी ९ डेंग्यूचे होते. आता निम्म्याहून अधिक रुग्ण सर्दी, खोकला व श्वसनमार्गाच्या आजारांचे दिसत आहेत. पावसाळी वातावरणात दूषित अन्न-पाण्यावाटे पसरणाऱ्या विषाणूजन्य हगवण, आमांश व अतिसाराच्या रुग्णांची संख्या वाढू शकेल. उलटय़ा व जुलाब ही या आजारांची प्रमुख लक्षणे असून लहान मुले व वृद्धांमध्ये हे आजार विशेषत्वाने दिसून येतात. अन्न-पाण्यातूनच पसरणाऱ्या टायफॉईड तापाची लागणही अशा वातावरणात वाढू शकते.’ गेल्या दोन दिवसांतील निरीक्षणात संधीवात, वयोमानापरत्वे होणारे सांध्यांचे त्रास, पाठ व कंबरदुखी, मान, कंबर व स्नायू लचकणे हे त्रासही वाढल्याचे निदर्शनास येत असल्याचे ते म्हणाले.

काय काळजी घ्यावी?
– डेंग्यूच्या तापात पुरेसे पाणी प्या, खाणे टाळू नका.
– कोणत्याही विषाणूजन्य तापावर विश्रांती हा एक महत्त्वाचा उपाय आहे.
– पावसात भिजल्यावर अंगावरच ओले कपडे वाळवू नका.
– बाहेरचे व शिळे अन्न टाळा. ताजे व गरम अन्न व शक्यतो गरम पेये घ्या. शक्य असल्यास उकळून गार केलेले पाणी प्या.

Ram Navami 2024 Shubh Yog
२०२४ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग जुळून आल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? ‘या’ रूपात दिसू शकते श्रीरामकृपा
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

‘गेल्या १५ ते २० दिवसांत चिकुनगुनियासारख्या तीव्र सांधेदुखीचे लक्षण रुग्णांत दिसत असले तरी तो शेवटी विषाणूजन्य ताप निघाला, असेही बघायला मिळाले आहे. तसेच रुग्णाचा प्लेटलेट काऊंट व्यवस्थित असला तरी त्याची डेंग्यू चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्याचेही दिसले आहे. विविध तापांची लक्षणे एकदम दिसत असल्याने रुग्णांचा त्रास वाढला आहे.’
– डॉ. संताजी कदम