सर्दी-खोकला-ताप यांबरोबरच पोटाचे विकार, डेंग्यूच्या रुग्णांत वाढ; खबरदारी घेण्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

पुणे : पावसाबरोबर तापमानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शहरात विषाणूजन्य आजारांचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सर्दी, खोकला, ताप यांच्याबरोबरच पोटाचे विकार आणि उलटय़ा, जुलाब अशा आजारांनी ग्रस्त तरुण रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ानंतर डेंग्यूच्या रुग्णांमध्येही लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

पावसाने अद्याप शहरात म्हणावा तसा जोर न धरल्याने तापमानात सातत्याने बदल होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. शहरात मलेरिया तापाचे रुग्ण नाहीत. मात्र डेंग्यूची लागण झालेले रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाण्याची पातळी खालावल्यामुळे अशुद्ध पाणी प्यायल्याने उलटय़ा, जुलाब आणि पोटाचे विकार झालेले अनेक रुग्ण औषधोपचारांसाठी येत असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली. उघडय़ावरचे पदार्थ सेवन केल्याने महाविद्यालयीन तरुणांमध्ये ही संख्या जास्त आहे. त्यामुळे बाहेरील अन्नपदार्थाचे सेवन करताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेतर्फे पाण्यावर शुद्धीकरणासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ सारखे आजार पुण्यात आढळलेले नाहीत, मात्र उलटय़ा, जुलाब या आजारांवर डॉक्टरांकडून औषध घ्या असा सल्ला महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी दिला.

पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पालिकेच्या आरोग्य विभागाकडे जून महिन्यात डेंग्यूचे १८१ संशयित रुग्ण आढळले. तपासणीनंतर त्यापैकी २८ रुग्णांना डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाले. जुलै महिन्यात आतापर्यंत डेंग्यूचे  ५७ संशयित रुग्ण आढळले  असून त्यापैकी २१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. जून महिन्यात डेंग्यूची उत्पत्ती स्थाने आढळलेल्या १८२० ठिकाणांना, तर जुलैमध्ये ५८ ठिकाणांना नोटीस बजावण्यात आली आहे.जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, वातावरणात सातत्याने होत असलेल्या चढ-उतारांमुळे विषाणूंच्या संसर्गामुळे पसरणारे आजार वाढताना

दिसत आहेत. ताप, सर्दी, खोकला अशा साथी पसरण्यास सुरुवात झाली आहे. तापाच्या रुग्णांपैकी तुरळक  रुग्णांचा ताप डेंग्यू असल्याचे ही तपासणीनंतर स्पष्ट होत आहे. यावर उपाय म्हणून नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसल्यास विश्रांती घेण्याची गरज आहे.

काय खबरदारी घ्याल?

* थंडी वाजून ताप भरणे, मोठय़ा प्रमाणात अंगदुखी आणि अंगावर लालसर रंगाचे चट्टे दिसत असल्यास ती डेंग्यू तापाची लक्षणे असू शकतात. डेंग्यूमध्ये पूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे. डेंग्यूचे डास साठलेल्या पाण्यात होत असल्याने घरात किंवा घराच्या आवारात पाणी साठणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे.

*  श्वासाचे आजार, ताप, सर्दी, खोकला यांच्यापासून बचाव करण्यासाठी आजाराची लक्षणे दिसल्यास पुरेशी विश्रांती घ्या. पावसात भिजणे टाळा. कोमट पाण्याच्या गुळण्या करणे, गरम पाणी पिणे हे उपाय करा.

* अशुद्ध पाणी प्यायल्याने होणारे पोटाचे विकार, उलटय़ा, जुलाब टाळण्यासाठी फिल्टरचा वापर करा. गाळून, उकळून थंड केलेले पाणी प्या. पाण्यामार्गे पसरणारे आजार गंभीर असल्याने औषध विक्रेत्यांकडून परस्पर औषधे न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

१ लाख ६५ हजार डास उत्पत्तीस्थळे

पुणे : पावसाळ्याच्या तोंडावर डासांच्या उत्पत्तीस्थळांच्या संख्येत यंदा गेल्या वर्षीपेक्षा वाढ झाली आहे. शहरात १ लाख ६५ हजार ९६५ एवढी डास उत्पत्तीस्थळे महापालिकेच्या आरोग्य विभागाला आढळून आली आहेत. या संख्येमध्ये गेल्या वर्षीपेक्षा ७६ हजार ६९ ने वाढ झाली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर डेंग्यू डासांच्या उत्पत्तीस्थळामध्ये वाढ झाल्यामुळे आरोग्य विभागापुढे ही उत्पत्तीस्थळे नष्ट करण्याचे आव्हान उभे राहिले असून यंदा डेंग्यूचा उद्रेक होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

शहरात अलीकडच्या काही वर्षांत डेंग्यूच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यूवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाकडून डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात येतात. मात्र उत्पत्तीस्थळांचे प्रमाण वाढले आहे. उपनगरांबरोबरच बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागातही उत्पत्तीस्थळे मोठय़ा प्रमाणावर आढळून आली आहेत. आरोग्य विभागाकडील अपुरे मनुष्यबळ पाहता यंदा ही उत्पत्तीस्थळे आरोग्य विभागासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी डेंग्यूच्या एकूण उत्पत्तीस्थळांची संख्या ८९ हजार ८९६ एवढी होती. त्यामध्ये ४२ हजार ५०८ उत्पत्तीस्थळे कायमस्वरूपी होती. यंदा शहरात एकूण १ लाख ६५ हजार ९६५ डेंग्यूची उत्पत्तीस्थळे आरोग्य विभागाला आढळून आली आहेत. त्यातील ४७ हजार ७४५ एवढी उत्पत्तीस्थळे कायमस्वरूपी आहेत. डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीस्थळामध्ये ७६ हजार ६९ एवढी वाढ वर्षभरात झाली आहे. त्यामध्ये कायमस्वरूपी ५ हजार २३७, तर ७० हजार ८८२ एवढी डेंग्यूची तात्पुरत्या स्वरूपातील उत्पत्तीस्थळे वाढल्याने या आजाराचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे.

कामे रखडली

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया या सारखे आजार फैलावण्याची भीती असताना  या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या कीटकजन्य औषधांची खरेदी अधिकाऱ्यांतील समन्वयाअभावी यंदा रखडली आहे. जुलै महिना सुरू झाल्यानंतर औषध खरेदीची ही प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय प्रशिक्षितकर्मचारी वर्गाच्या जागा रिक्त असल्यामुळे पावसाळ्यापुरत्या काही जागा ठेकेदारामार्फत भरण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पुणेकरांचे आरोग्य वाऱ्यावर राहणार का, असा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.