प्रणाली वापराच्या माहितीसाठी पुण्यातील प्रशिक्षण पूर्ण

पुणे : रस्ते अपघात रोखण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात केंद्र शासनाच्या पुढाकाराने वेब पोर्टल तयार करण्यात आले असून, त्याच्या वापराची माहिती देण्यासाठी पुण्यातील प्रशिक्षण सत्र नुकतेच पूर्ण करण्यात आले. मोटार वाहन विभाग, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी त्यात सहभाग घेतला.

भारतातील अपघातांची संख्या लक्षात घेता केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नई येथील राष्ट्रीय माहिती केंद्राने स्वतंत्र वेब पोर्टल तयार केले आहे. रस्त्यावर एखादा अपघात झाल्यानंतर प्रत्यक्ष काम करणारे विभाग, संस्थांनी संबंधित अपघाताची माहिती त्यात समाविष्ट करणे, अपघातांची कारणे शोधणे आणि पुन्हा अशा प्रकारचा अपघात होऊ नये, यासाठीच्या उपाययोजना सुचविणे. त्यावर अंमलबजावणी करणे आदींसाठी हा वेब पोर्टलचा वापर करण्यात येतो. महाराष्ट्रामध्ये पुण्यासह सोलापूर, नगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये अपघातांची संख्या आणि रस्त्यांची लांबीही जास्त आहे. त्यामुळे या जिल्ह्यांचा संबंधित उपक्रमात सहभाग करण्यात आला आहे.

अपघात रोखण्याच्या उपाययोजनांसाठी निर्माण करण्यात आलेल्या संगणक प्रणालीचे प्रशिक्षण सध्या अधिकारी पातळीवर देण्यात आले. त्यानंतर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देणार आहे. प्रशिक्षणासाठी गेल्या दोन दिवसांत पुण्यात तीन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय माहिती केंद्राच्या अधिकाऱ्यांसह निवृत्त मोटार वाहन निरीक्षक अनिल पंतोजी यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.