एकीकडे व्यसनातून बाहेर पडण्याची धडपड आणि दुसरीकडे बेरोजगारीची दरी अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. व्यसनातून प्रयत्नपूर्वक मुक्त झालेल्या तसेच व्यसनमुक्तीसाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तींना नोकरी शोधण्यासाठी मदत करणारे एक संकेतस्थळ लवकरच सुरू होत आहे. विशेष म्हणजे या संकेतस्थळाला राज्य आणि केंद्र शासनाची मदत मिळणार आहे.
पुण्यातील ‘विकिरण इन्फॉर्मेशन फाऊंडेशन’ या संस्थेने सुरू केलेल्या ‘आरोग्य डॉट कॉम’ या संकेतस्थळाचाच एक उपक्रम म्हणून ‘उत्थान सेवा’ हे संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. हे संकेतस्थळ नोकरी शोधण्यासाठीच्या इतर संकेतस्थळांसारखेच काम करणार असून केवळ व्यसनमुक्त आणि व्यसनमुक्तीच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तींनाच त्याचा लाभ घेता येणार आहे. आरोग्य डॉट कॉमचे प्रकल्प समन्वयक पराग यादव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यादव म्हणाले, ‘‘२६ जूनला जागतिक व्यसनमुक्ती दिनाच्या निमित्ताने उत्थान सेवा प्रकल्प सुरू करण्याचे लक्ष्य होते. परंतु काही कारणांमुळे झालेल्या विलंबामुळे हे संकेतस्थळ जुलैच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होईल. संस्थेने २०११ मध्ये राज्याच्या सामाजिक न्याय विभागाबरोबर पुण्यात एक व्यसनमुक्तांना नोकरी मिळवून देण्यासाठीचा पथदर्शी प्रकल्प राबवला होता. या प्रकल्पात नोकरी देणारे २५ जण सहभागी झाले होते, तर प्रकल्पाअंती ७२ व्यसनमुक्तांना रोजगार मिळाला. उत्थान सेवा प्रकल्पाच्या प्रचार व प्रसारासाठी राज्य व केंद्र शासनाचे साहाय्य मिळणार असून त्यासंबंधी राज्य शासनाची केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सबलीकरण विभागाशी बोलणी सुरू आहेत.’’
उत्थान सेवा प्रकल्पासाठी व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या संस्थांकडून इच्छुक उमेदवारांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सध्या या प्रकल्पासाठी सुमारे ३०० ते ३२५ व्यसनमुक्त व्यक्तींनी नावनोंदणी केली असून त्यातील १०० ते १५० जण पुण्याचे आहेत.
संस्थेचे संस्थापक तुषार संपत यांना त्यांच्या व्यसनमुक्तीविषयक कार्याबद्दल २६ जूनला दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचेही यादव यांनी सांगितले.  
 
उत्थान सेवा प्रकल्पाची वैशिष्टय़े
– व्यसनमुक्त किंवा व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींच्या रोजगार कौशल्यांबाबतची माहिती संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल. व्यक्तीची ओळख गोपनीय राहील अशी काळजी घेतली जाईल.
– ही माहिती सामान्य नागरिकांना पाहता येईल.
– नोकरी देऊ इच्छिणारे लोक व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या संबंधित संस्थेद्वारे उमेदवारांशी संपर्क साधू शकतील.